इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू
विद्यार्थ्यांना ३० जानेवारीपर्यंत घेता येणार प्रवेश : डॉ. अजित मोरे
नाशिक : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या (IGNOU) विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, नाशिक जिल्ह्यात मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात ‘इग्नू’चे अभ्यासकेंद्र आहे. या अभ्यासकेंद्रात १३-प्रमाणपत्र, ५-पदविका, १३-पदवी, २४-पदव्युत्तर पदविका, ३५ पदव्युत्तर पदवी असे एकूण ९० अभ्यासक्रम राबविले जातात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ३० जानेवारीपूर्वी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन केंद्र समन्वयक तथा मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. अजित मोरे यांनी केले आहे.
‘इग्नू’कडून या वर्षात एकूण २५३ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिले जाणार असून, यासाठी विद्यापीठाच्या https://ignouadmission.samarth.edu.in या संकेतस्थळावर ऑनलाइन प्रवेश घेता येणार आहेत. प्रवेश नोंदणीसाठी ३० जानेवारी ही अंतिम मुदत असून, त्यापूर्वीच विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणे अपेक्षित आहे. नोकरी, व्यवसाय, घरकाम किंवा कुठल्याही क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त व दूरस्थ शिक्षणाची सुविधा ‘इग्नू’कडून देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्याला पात्रतेनुसार विविध प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येऊ शकतो. याशिवाय युजीसी मान्यतेनुसार ‘इग्नू’तून मिळविलेल्या सर्व अभ्यासक्रमांना पारंपारिक विद्यापीठातून मिळविलेल्या अभ्यासक्रमासारखी समकक्षता आहे. पारंपारिक विद्यापीठातील अभ्यासक्रमासोबत इग्नूच्या अभ्यासक्रमासही प्रवेश घेणे शक्य आहे. याशिवाय इग्नूकडून ४३ ऑनलाइन अभ्यासक्रमानांही प्रवेश सुरू झाले आहेत. यात अभ्यास साहित्य, परीक्षा ही ऑनलाइन होणार आहे.
इग्नू अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये : राष्ट्रीय पातळीचा विद्यापीठाचा दर्जा, दर्जेदार स्वयंअध्ययन अभ्यास साहित्य, दृकश्राव्य साहित्य, लवचिक प्रवेश नियम, स्वयंअध्ययन, अद्ययावत शैक्षणिक व माहिती, तंत्रज्ञानाचा वापर, पत्त्यावर घरपोच अभ्यास साहित्य, विद्यार्थी सहाय्य सेवा, किफायतशीर प्रवेश फी, वयाची अट नाही.
Comments
Post a Comment