माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन
धारणगाव श्री दत्त देवस्थानास ब वर्ग दर्जा देण्यासाठी प्रयत्न करणार- माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
धारणगाव,दि.१२ फेब्रुवारी :- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धारणगाव येथील श्री.दत्त देवस्थानच्या विकासासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच या देवस्थानाला ब वर्ग धार्मिक स्थळाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्री.दत्त देवस्थान धारणगाव येथे सभामंडपाचा अनावरण सोहळा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी दत्त देवस्थानचे मठाधिपती महंत महेशगिरी महाराज, माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी सभापती बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, जयदत्त होळकर, डॉ.श्रीकांत आवारे, येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, सरपंच बाळासाहेब पुंड, दत्तूपंत डुकरे, सचिन दरेकर, अनिल सोनवणे, पांडुरंग राऊत, विनोद जोशी, शिवाजी सुपनर, अशोक नागरे, संजय गायकवाड, अशोक जाधव, प्रकाश घोटेकर, राजूभाऊ गंभिरे, योगेश साबळे, रामभाऊ जगताप, जगन काकडे, शिवनाथ काकडे, पांडुरंग काकडे, दिलीप काकडे, सुधीर बनकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की,येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघात आपण कोट्यावधी रुपयांची विकास कामे केली आहे. यामध्ये अनेक महत्वाच्या धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास करण्यात आला आहे. कोटमगांव येथील जगदंबा माता मंदिर, निमगाव वाकडा येथील रेणुका माता मंदिर, विंचुर येथील लोणजाई माता मंदिर, सावरगांव येथील श्री स्वामी समर्थ महाराज मंदिर, श्री. क्षेत्र खेडलेझुंगे, यासह विविध धार्मिक स्थळांचा विकास करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांच्या विकास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, सध्या येवला ते पिंपळस, लासलगाव विंचुर खेडले रस्ता चौपदरीकरण, लासलगाव उपजिल्हा रुग्णालय, लासलगाव बाह्य वळण रस्ता यासह अनेक विकासाची कामे सुरू आहे. येवला मतदारसंघातील ४२ गांव परिसरात सर्वाधिक कामे सुरू असून ही कामे लवकरच मार्गी लागतील. नैताळे रस्त्याचे काम सीआरएफ अंतर्गत मार्गी लावण्यात येईल. तसेच आमदार पंकज भुजबळ यांच्या निधीतून २० लाख रुपये निधी देवस्थानाच्या विकासासाठी देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, श्री दत्त देवस्थान मंदिर विकसित करत असताना अतिशय प्राचीन स्वरूपात विकसित करण्यास प्राधान्य देण्यात येईल. या देवस्थानाच्या विकासासाठी आवश्यक तो निधी आपण उपलब्ध करून देण्यात येईल. त्यातून या धार्मिक स्थळाचा परिपूर्ण विकास करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी महसूल सहायक पदी निवड झाल्याबद्दल भरत पंडित सोनवणे यांचा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Comments
Post a Comment