मविप्रच्या विस्तारित इमारती, जलकुंभाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा
फोटो नाशिक : गंगापूर रोडवरील उदाजी महाराज वसतिगृह कॅम्पस परिसरातील महाविद्यालय विस्तारित इमारत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी बोलताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे. व्यासपीठावर पदाधिकारी व मान्यवर
शिक्षण-आरोग्य सेवा देणारी एकमेव संस्था : ॲड. नितीन ठाकरे
नाशिक :- मविप्र संस्थेच्या ज्या उदाजी महाराज वसतिगृह आवारात संस्थेची पहिली शाळा सुरु झाली, त्याच ठिकाणी आज अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त अशी महाविद्यालये आणि इंग्रजी शाळा उभ्या आहेत. येथून शिक्षण घेऊन हजारो विद्यार्थी मोठ्या हुद्द्यांवर कार्यरत आहेत, तर हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. अगदी केजी टू पीजी शिक्षण आणि आरोग्य सेवा देणारी मराठा विद्या प्रसारक समाज ही महाराष्ट्रातील एकमेव शिक्षणसंस्था आहे, असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या गंगापूर रोडवरील उदाजी महाराज वसतिगृह कॅम्पस परिसरातील दोन महाविद्यालये आणि दोन इंग्रजी शाळांच्या विस्तारित इमारती आणि जलकुंभाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा बुधवारी (दि.५) मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते विधिवत पूजनाने पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर मविप्रचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी, उपसभापती देवराम मोगल, संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, रमेश पिंगळे, सेवक सदय प्रा. एस. के. शिंदे, सी. डी. शिंदे, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. के. एस. शिंदे, ज्येष्ठ सभासद दत्तात्रय कोशिरे, निवृत्ती जाधव, प्राचार्य डॉ. सतिश देवणे, प्राचार्य डॉ. प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. बापूसाहेब भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले, दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या सोयीसुविधा लक्षात घेता शाखाविस्तार करणे गरजेचे आहे. नवीन बांधकामाचा खर्च संस्थेला परवडणारा नसला तरी जनमताचा रेटा, विद्यार्थ्यांची गरज, प्राचार्यांचा दबाव लक्षात घेता काही कामे करणे क्रमप्राप्त ठरते, असे मत ॲड. ठाकरे यांनी व्यक्त केले. बांधकामाचा दर्जा चांगला आणि लवकरात लवकर बांधकाम पूर्ण करून द्यावे, अशा सूचनाही त्यांनी ठेकेदारांना दिल्या.
सुरुवातीला मविप्रच्या कर्मवीर ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पाण्याच्या टाकीचे व विस्तारित इमारतीचे, उदाजी होरायझन स्कूलच्या विस्तारित इमारतीचे, होरायझन अकॅडमीच्या विस्तारित इमारतीचे आणि राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकच्या विस्तारित इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. प्रा. सुशांत आहेर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.भूषण देशमुख यांनी आभार मानले.
-------------------------------
*फोटो कॅप्शन*
नाशिक : गंगापूर रोडवरील उदाजी महाराज वसतिगृह कॅम्पस परिसरातील महाविद्यालय विस्तारित इमारत बांधकामाचे भूमिपूजन करताना मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, समवेत पदाधिकारी व मान्यवर.
Comments
Post a Comment