कृषी महोत्सव हे कृषी तज्ञ, सामाजिक संस्था, प्रयोगशील शेतकरी आणि विद्यार्थ्यासाठी महत्वाचे व्यासपीठ - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
ज्ञान हीच खरी संपत्ती - माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ
नाशिक,दि.१० फेब्रुवारी:- भक्ती पूर्वक शेती करण्यास शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावे. त्याला विज्ञानाची जोड कशी द्यायची याची शिकवण गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्याकडून मिळत आहे. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा. हा कृषी महोत्सव कृषी तज्ञ, सामाजिक संस्था, प्रयोगशील शेतकरी आणि विद्यार्थ्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे. ज्ञान हीच खरी संपत्ती आहे. ते ज्ञान आपल्याला गुरुमाऊली देत आहे ते आपल्या गावापर्यंत पोहचवा असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत आयोजित जागतिक कृषि महोत्सव, सोहळ्यात सरपंच ग्रामसेवक मांदियाळी कार्यक्रम गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, चंद्रकांत मोरे, आबासाहेब मोरे, नितीन मोरे, माजी नगरसेवक उद्धव निमसे, सुनीता निमसे, डॉ.दिपक गिरासे, पांडुरंग राऊत, समाधान जेजुरकर यांच्यासह पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, देश विदेशातील हजारो शेतकरी बांधव या महोत्सवाला भेटी देतात आणि तंत्रज्ञान,अध्यात्मिक, नैसर्गिक, रसायनमुक्त सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन घेतात. गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांसाठी सेवाभावी उपक्रम, विनामुल्य चर्चासत्र, तज्ञ मार्गदर्शन,दुर्मिळ औषधी, रानभाज्या व गावरान बियाणे प्रदर्शन, कृषी प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम, पशुपालन, विवाह नोंदणी परिचय मेळावा, रोजगार मेळावा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कृषी महोत्सव कृषी तज्ञ, सामाजिक संस्था, प्रयोगशील शेतकरी आणि विद्यार्थ्यासाठी महत्वाचे व्यासपीठ आहे.
ते म्हणाले की, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ६५.५३% लोकं गाव-खेड्यात राहतात. त्यामुळे, आजही बहुसंख्य नागरिक खेड्यातच राहतात. म्हणजे भारत हा खेड्यांचाच देश होता आणि आजही आहे. त्यामुळे खरा भारत हा खेड्यातच राहतो. स्वातंत्र्योत्तर काळात भारताने विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान, औद्योगिकरण आणि इतर क्षेत्रात बरीच प्रगती केली. शहरांची झपाट्याने प्रगती झाली. गाव-खेड्यांमधून अनेक लोकांचे शहराकडे स्थलांतर झाले आणि आजही होत आहे. लोकांना आपली जन्मभूमी सोडून शहरात जाणं अजिबात आवडत नाही. परंतु, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांना नाईलाजाने शहरात स्थानांतरित व्हावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे गावातील रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा अभाव. आपल्या गावचा सर्वांगणी विकास व्हावा, रोजगार उपलब्ध होऊन वीज, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासाठी सरपंच हा अतिशय महत्वाचा असून एक जिद्द आणि चिकाटी असलेलं सक्षम नेतृत्व गावात असायला हवं.
ते म्हणाले की, सद्यस्थितीत ग्रामपंचायतीला पहिल्यापेक्षा अधिक बळकटी मिळाली आहे. सरपंचाला एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीप्रमाणे अधिकार प्राप्त झाले आहेत. यात अजिबात अतिशोयक्ती नाही. पण सरपंचाला स्वतःच्या अधिकारांची माहिती नसते. काहींना ते अधिकार माहित असेल तरी त्यांना उपयोगात आणत नाहीत किंवा त्याची अंमलबजावणी करण्यात ते सक्षम नसतात. सरपंचने ठरवलं तर आपल्या छोट्याश्या गावाला नंदनवन बनवू शकतो. मात्र सर्वप्रथम त्याने तसे ठरवणे महत्वाचे आहे.
ते म्हणाले की, राज्यात अशी अनके नंदनवनं फुलली आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने पाटोदा गाव, हिवरे बाजार व राळेगणसिद्धी अश्या आदर्श गावांचा उल्लेख करता येईल. त्या गावातील सरपंचानी अनके प्रश्न, अडचणीना सामोरे जात आपल्या गावाचं नाव लोकांसमोर ‘आदर्श गाव’ म्हणून ठेवलं. अश्या सरपंचाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून आपापली गावे विकासपथावर नक्कीच आणता येतील असेही ते म्हणाले.
ते म्हणाले की, गावाचा विकास झाला तर पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होतो. त्यामुळे देशाच्या विकासात सरपंचांचे योगदान हे अतिशय महत्वाचे आहे. या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी सरपंचाना जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. या व्यासपीठाचा फायदा सरपंच मंडळींनी करून घ्यावा आणि आपल्या गावाचा विकास साधावा असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले.
Comments
Post a Comment