पुस्तक वाचनाने ज्ञानसाठा समृद्ध - डॉ. भास्कर ढोके
मविप्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम
नाशिक :- पुस्तक वाचनातून आपल्याला ज्ञान मिळते. पुस्तके ही माहिती आणि ज्ञानाचा समृद्ध स्रोत आहे. पुस्तक वाचताना ज्ञानाचा साठा समृद्ध होत जातो. त्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित पुस्तके वाचावी, असे आवाहन मविप्र संस्थेचे शिक्षणाधिकारी प्रा. डॉ. भास्कर ढोके यांनी केले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने मविप्र औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयामध्ये आयोजित ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रेरणादायी कार्याचा आढावा घेतला.
यावेळी प्रा. डॉ. ढोके यांनी सांगितले कि, पुस्तक वाचताना वाचकाची सर्व इंद्रिये कार्यरत असतात. याचमुळे वाचक पुस्तकांशी एकरूप होऊ शकतो. लेखक पुस्तक लिहिताना सखोल अभ्यास करून ते ज्ञान आपल्या पुढे मांडत असतात व त्यातून आपली विचार करण्याची क्षमता उंचावते, असे सांगून त्यांनी पुस्तके कशी वाचावीत, यावरदेखील मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वाचलेल्या विविध कादंबऱ्यांचीही माहिती दिली.
या उपक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. व्हि. डेर्ले, पदव्युतर विभागप्रमुख डॉ. एम. पी. वाघ यांनीही मुलांना व्यक्तिमत्व विकासासाठी काय वाचावे, कसे वाचावे, यासंदर्भात मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांना ग्रंथालयातून पुस्तके उपलब्ध करून त्यांचे सामूहिक वाचन घेण्यात आले. पुस्तकावर अभिप्राय लेखन स्पर्धेला मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. डी. व्हि. डेर्ले यांनी प्रास्ताविक केले. महाविद्यालयातील ग्रंथालयात भरविण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे नियोजन सहाय्यक ग्रंथपाल एस. डी. शिंदे व ग्रंथालय परिचर डी. ठाकोर यांनी केले. डॉ. वंदना नाडे यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडली. प्रा. सुरभी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. पदव्युतर विभागप्रमुख डॉ. एम. पी. वाघ यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment