‘एमएमआर’ क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करावी

उद्योगांना प्रक्रिया केलेलेच पाणी द्यावे

वन आणि इतर परवानग्यांना गती द्यावी
मुंबई, दि. 27 : मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील वाढत्या लोकसंख्येला पुरेसा पाणी पुरवठा होण्यासाठी या क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत. महसूल व वन विभागाने यासाठी आवश्यक त्या परवानग्या देण्याबरोबरच भूसंपादन प्रक्रिया निश्चित कालमर्यादा निर्धारित करुन तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री तथा नगरविकास व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे प्रकल्प) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री गणेश नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह संबंधित विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व सचिव उपस्थित होते.

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रातील जलसंपदा प्रकल्प केवळ पिण्याच्या पाण्याचा स्रोत नसून, शाश्वत विकासासाठी महत्त्वाचा घटक आहेत. आगामी काळात जल व्यवस्थापनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करून हे प्रकल्प कालबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करावेत. या प्रकल्पासंदर्भात वन विभागाची मान्यता, एमएमआरडीए, सिडको आदी कार्यान्वयिन यंत्रणांनी परवाने व इतर अनुषंगिक बाबीसंदर्भातील कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामास गती द्यावी, असे निर्देश  फडणवीस यांनी दिले.

शाई व सुसरी प्रकल्पाची कामे सुरू करा

मुंबई महानगर क्षेत्र हे सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरी भागांपैकी एक असून, पाणीपुरवठा हा येथील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आगामी काळातील पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता शाई व सुसरी प्रकल्पाची कामे सुरू करण्याबाबत जलसंपदा विभाग आणि संबंधित यंत्रणेने कार्यवाही करावी, अशा सूचना मुख्यमंत्री  फडणवीस यांनी दिल्या.

एसटीपी प्रकल्पातील पाणी औद्योगिक वापरासाठी

मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रामध्ये ज्याठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिया (एसटीपी) प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू आहेत, तेथील पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) औद्योगिक वापरासाठी घ्यावे. या पाण्यावर आणखी काही प्रक्रिया करता येते, का याबाबतही अभ्यास करावा. एसटीपी प्रकल्पातील पाणी औद्योगिक वापरासाठी घेण्यासंदर्भात मुख्य सचिव यांनी एमआयडीसी आणि नगरविकास विभाग यांची एकत्रित बैठक घ्यावी.

अनेक ठिकाणी पिण्याच्या पाईपलाईन जुन्या झाल्या असल्याने पाण्याची गळती होते. पाण्याची ही गळती रोखण्यासाठी जुन्या पाईपलाईन बदलण्याबाबत कार्यवाही करावी. वाहून जाणारे पुराचे पाणी साठवण्याबाबतही नियोजन करावे, अशा सूचना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.

काळू नदी प्रकल्पाचे काम जलदगतीने पूर्ण करावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात पिण्यासाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी काळू नदी प्रकल्प महत्त्वाचा असून हा प्रकल्प जलद गतीने पूर्ण करावा. ठाणे व परिसरातील नवीन वसलेल्या भागाला अतिरिक्त पाणी उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले.

बैठकीत देहरजी मध्यम प्रकल्प, काळू नदी प्रकल्प, भातसा (मुमरी) प्रकल्प, सूर्या (कवडास) उन्नैयी बंधारा, सूर्या नदीवरील पाच बंधारे, बाळगंगा नदी प्रकल्प, खोलसापाडा-2 लघु पाटबंधारे योजना, श्री हरिहरेश्वर पाणीपुरवठा योजना, जांभिवली (चिखलोली), शाई नदी प्रकल्प आणि सुसरी नदी प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला