नाॅयलान मांजा वापरल्यास कारवाई करण्यात येईल - मनपा आयुक्त मनीषा खत्री
नाशिक :- दि.१०/०१/२०२५(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी नायलॉन मांजा वापरू नये याबाबत महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयातील आधिकारी, सर्व महानगरपालिका आयुक्त,पोलीस आयुक्तालयातील अधिकारी यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज बैठक घेतली. या बैठकीत नायलॉन मांजा वापरू नये व साठवणूक करू नये असे निर्देश देऊन नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे भूमिका देखील त्यांनी स्पष्ट केली.
व्हीडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी नागरिकांना नायलॉन मांजा वापरू नये, असे आवाहन केले आहे.नायलॉन मांजा एक पर्यावरणीय धोका असून ते पक्षी, प्राणी आणि मानवासाठी धोकादायक असल्याचे त्यानी सांगितले.
यावेळी आयुक्त खत्री यांनी नायलॉन मांजा वापरणाऱ्यांविरुद्ध व साठवणूक करणाऱ्या विरुद्ध तसेच विक्री करतांना आढळून आल्यास कारवाई केली जाईल. नायलॉन मांजामुळे अनेक पक्षी जखमी होत आहेत किंवा मृत्युमुखी पडत आहेत. याशिवाय, मानवी जीवितालाही यामुळे गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, विशेषतः सणासुदीच्या काळात, जेव्हा विविध जागांवर पतंगांची स्पर्धा असते.
तसेच, त्यांनी सर्व नागरिकांना पतंगाच्या स्पर्धांमध्ये केवळ पारंपरिक कापडाचा मांजा वापरण्याचे आवाहन केले आहे.
आयुक्त मनिषा खत्री यांनी सर्व नाशिककरांना सहकार्याची अपेक्षा व्यक्त करत, नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे नुकसान ओळखून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे, असे आवाहन केले आहे.
नायलॉन मांजा विरोधी व्हीडिओ कॉन्फरन्सला मनपा अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, पर्यावरण विभाग प्रमुख अजित निकत उपस्थित होते.
आज महापालिककेच्या वतीने पर्यावरण विभाग आणि घनकचरा विभागाने ८६ पतंग व मांजा विक्री दुकानांची पहाणी,तपासणी केली या दुकानात नायलॉन मांजा आढळून आला नाही अशी माहिती पर्यावरण उपायुक्त अजित निकत यांनी दिली.
नागरिकांनी दुचाकी वाहन चालकांनी मोटर सायकलला उलटी U कमान लावणे, प्रवास करताना हेल्मेट, मफलर, स्कार्फ, फुल शर्ट याचा वापर करावा जेणेकरून मांजा मुळे दुखापत होणार नाही, नायलॉन मांजा विरहित संक्रात साजरी करवी असे आवाहन अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी केले.
Comments
Post a Comment