आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 29 : सार्वजनिक आरोग्य विभागातील राज्य व विभागीय स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य संस्थांना नियमित भेटी द्याव्यात, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या.

आरोग्य सेवा आयुक्तालयात आयोजित केलेल्या राज्यातील सर्व परिमंडळातील आरोग्य सेवेच्या आढावा बैठकीत आबिटकर बोलत होते. यावेळी आरोग्य सेवा आयुक्तालय तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालनालयाचे संचालक अमगोथू श्री रंगा नायक, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ. कंदेवाड डॉ. बाविस्कर यांच्यासह आठ विभागांचे उपसंचालक आदी उपस्थित होते.

सार्वजनिक आरोग्य मंत्री  आबिटकर म्हणाले, आरोग्य संस्थाच्या भेटी वेळी रुग्णालयातील स्वच्छता, सुरक्षा, परिसर स्वच्छता, रुग्णाच्या आहाराचा दर्जा, रुग्णाना मिळणारी वागणूक, औषधांची उपलब्धता, बाह्य संस्थेद्वारे नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधन या बाबींची काटेकोर पाहणी करण्यात यावी. आरोग्य संस्थांच्या कामात अनियमितता आढळल्यास संबंधितावर तातडीने कारवाई करावी. वेळेनुसार मी स्वतः देखील आरोग्य संस्थांना भेटी देईन, असेही  आबिटकर यांनी यावेळी सांगितले.

 प्रत्येक शासकीय दवाखान्यात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात. सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची पहिली नियुक्ती झालेला दवाखाना दत्तक घेवून तेथे उत्तम आरोग्य सुविधा देण्याबाबत प्रयत्न करावेत. आरोग्य संस्थांच्या सेवांवरील लोकांचा विश्वास दृढ होण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश  आबिटकर यांनी दिले.

 गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची कडक अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याबाबत माहिती देणाऱ्याला एक लाखाचे बक्षीस देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे स्टिंग ऑपरेशन पथकात सहभागी सदस्याना मानधन देण्यात येईल, याविषयी लोकांमध्ये जागृती करावी, तसेच संबंधित समित्याना प्रोत्साहीत करावे, सामाजिक जाणीव असलेल्या लोकांचा, सेवाभावी संस्थाचा सहभाग वाढवावा, असेही  आबिटकर यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन