तर हृदयाच्या आजारांना रोखणे शक्य - डॉ. हिरालाल पवार
नाशिक : मविप्रच्या गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेप्रसंगी बोलताना डॉ. हिरालाल पवार. समवेत मान्यवर
केटीएचएम महाविद्यालयातील व्याख्यानमालेत मांडले मत
नाशिक :- योग्य आहार, नियमित व्यायाम आणि वेळच्यावेळी घेतलेली औषधे यामुळे हृदयाच्या विविध आजारांना रोखता येते, असे प्रतिपादन हृदयाक्ष हॉस्पिटलचे संचालक सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हिरालाल पवार यांनी केले. मविप्रच्या गंगापूर रोडवरील केटीएचएम महाविद्यालयात आयोजित व्याख्यानमालेत ‘हृदयरोग समस्या व उपाय’ या विषयावर ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एस. काळे, उपप्राचार्य डॉ. एस. के. शिंदे, विज्ञान विभाग प्रमुख के. आर. रेडगांवकर, कला विभागप्रमुख आर. एस. पवार, वाणिज्य विभागप्रमुख डी. बी. गावले आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. पवार म्हणाले की, तरुण व्यक्तीला येणारे हार्ट अटॅक खूप तीव्र स्वरूपाचे असतात. त्यामुळे वेळीच तपासणी करणे खूप गरजेचे आहे. हृदय रोगाची लक्षणे ओळखून लगेचच उपचार घेणे आवश्यक आहे. अचानक हार्ट अटॅक आल्यानंतर आजूबाजूच्या व्यक्तींनी कोणती, कशी मदत करावी, याबाबत त्यांनी माहिती सांगितली., समाजामध्ये हृदयरोगाविषयी जनजागृती झाली, आधीच तपासण्या केल्या तर केवळ औषधोपचारानेच हृदयरोगाचे धोके टाळू शकतो, असा सल्लाही डॉ. हिरालाल पवार यांनी दिला.
यावेळी डॉ. हिरालाल पवार यांनी सर्व प्राध्यापकांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. एस. के. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय एस. बी. पाटील यांनी करून दिला. किरण रेडगांवकर यांनी आभार मानले.
‘वेळ निघून गेल्यावर पैशाचाही उपयोग होत नाही...’
बदलत्या जीवनशैलीमुळे कमी झोप, अयोग्य आहार, तसेच सदैव स्ट्रेसमध्ये राहणे, यामुळे तरुणांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण वाढले आहे. हृदयरोग झाल्यावर डॉक्टरकडे न जाता नियमित तपासणीद्वारे हार्ट अटॅकचा धोका टाळता येतो. नियमित व्यायाम करणाऱ्यांना हृदय रोगाची लक्षणे लवकर जाणवतात. अँजिओग्राफी, सिटी एनजीओ वगैरे उपचार वेळीच केले तर रुग्णांचे प्राण वाचतात. वेळ निघून गेल्यावर पैशानेही उपचार होत नाही, असेही डॉ. पवार यांनी सांगितले.
*डॉ. हिरालाल पवार म्हणाले...*
१) विमानतळावर ज्याप्रमाणे इनक्युब लेटरची सोय असते, त्याप्रमाणे मॉल, थिएटर्स, कॉलेज व विविध ठिकाणी इनक्युब लेटरची उपलब्धता असणे गरजेचे आहे.
२) रुग्णाला हॉस्पिटलमध्ये नेण्याआधी सीपीआर करणे गरजेचे आहे. सर्वांनीच सीपीआरचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. त्यामुळे हृदय पंपिंग चालू राहते, मेंदूला रक्तपुरवठा होतो व वैद्यकीय मदत मिळेपर्यंत त्याचा फायदा होतो.
३) उच्च बीपी, उच्च कोलेस्ट्रॉल, स्थुलपणा, डायबिटीज, चुकीचे डाएट वगैरे समस्या असतील तर हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते. त्यामुळे वेळीच काळजी घ्यावी.
४) आरोग्याच्या बाबतीत अती आत्मविश्वास बाळगू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे सुरू करावीत.
Comments
Post a Comment