स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान वर्षभर सुरू राहावे - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे



‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा उपमुख्यमंत्र्यांकडून राज्यस्तरीय शुभारंभ

मुंबई, दि. १७ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ पर्यंत म्हणजेच पंधरवडापुरतेच मर्यादित न ठेवता ते वर्षभर सुरू ठेवावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मध्यप्रदेश येथील धार येथून ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ केला. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड येथून सहभाग घेतला. त्यानंतर मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथून या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते.या राज्यस्तरीय शुभारंभाच्या वेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव, विधानपरिषद सदस्य डॉ.मनीषा कायंदे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, सचिव डॉ.निपुण विनायक, आरोग्यसेवा आयुक्त कादंबरी बलकवडे, केंद्रीय सहसचिव ज्योती यादव आदी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, घरातील महिला कुटुंबाची देखभाल करताना आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. अशा वेळी देशभरातील महिला या अभियानाचा लाभ घेऊ शकणार आहेत. रोगाचे लवकर निदान होणे महत्त्वाचे असून आरोग्य तपासणी ही केवळ पंधरा दिवस चालणारी बाब नाही. त्यामुळे आपल्या आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यात येत आहेत. यापूर्वी माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित हे देखील अभियान राबविले असल्याचा दाखला त्यांनी दिला. प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याच्या विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पैलवान चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जम्मू काश्मीर येथे एक हजार पैलवानांनी देशातील सैनिकांसाठी रक्तदान केले होते. आजच्या दिवसाचे औचित्य साधून रोजगार हमी योजनेतंर्गत २० जिल्ह्यात पाणंद रस्ते तयार करण्याचा शुभारंभ होत आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी, ऑपरेशन सिंदूर, पर्यावरण असे विविध विषय घेऊन चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्‍याचबरोबर महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांमध्ये विविध योजनांद्वारे आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येत आहे. राज्यातील नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायती यामध्ये ३९४ ‘नमो गार्डन’ तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जलसंधारण विभागामार्फत ७५ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. शेतकऱ्यांना शेतीची अवजारे, यंत्रसामग्रीचे वाटप देखील प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त होत आहे. उद्योग विभागामार्फत नमो कौशल्य केंद्र, ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र, कृषी उद्योग कौशल्य केंद्र असे विविध उपक्रम देखील सुरू होत आहेत. मराठी भाषा विभागांतर्गत आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या ५० देशांपर्यत वाढविण्यासाठी ‘मनो वैश्विक संपर्क समन्वय अभियान’ देखील आजपासून सुरू होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाद्वारे लोकांची सेवा – मंत्री प्रकाश आबिटकर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून आरोग्य विभागामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियान राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी ज्या जनभावनेने समाजकार्य केले आहे, त्याच भावनेतून या अभियानाच्या माध्यमातून लोकांची सेवा व्हावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. आरोग्यमंत्री आबिटकर म्हणाले की, स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानाच्या माध्यमातून महिलांची तपासणी, उच्च रक्तदाब, मधुमेह, गर्भाशयाच्या कर्करोगाची आणि क्षयरोगाची तपासणी केली जाईल, विशेषतः किशोरवयीन मुली आणि महिलांसाठी, ॲनिमिया तपासणी आणि समुपदेशनाचे कामसुद्धा केले जाणार आहे. आदिवासी भागातील महिलांसाठी सिकलसेल तपासणी, कार्ड वाटप आणि समुपदेशन, गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व काळजी आणि तपासणी असे अनेक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या अभियानाच्या निमित्ताने ७५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. यात संसर्गजन्य रोग तपासणी, मधुमेह, रक्तदाब, कर्करोग आणि हृदयरोग तपासण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मोफत चष्मा वाटपाची सुद्धा ७५ शिबिरे आयोजित करण्यात येत असून लोकांना त्याचा लाभ मिळत आहे. त्याचबरोबर ७५ दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माता आणि बाल आरोग्याची ७५ शिबिरे घेण्यात येत असून यात प्रसूतीपूर्व तपासणी करण्यात येईल. महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिला तसेच बालकांसाठी पोषण जाणीवाची ७५ सत्रे घेण्यात येत असून आयुष आणि योग शिबिराची सुद्धा ७५ सत्रे घेण्यात येत आहेत. त्याचबरोबर, रक्तदान, अवयवदान, मोफत औषध वितरण, वेगवेगळ्या रोगांचे निदान शिबिरे, कर्करोग जागृती, तपासणी शिबिर, मानसिक आरोग्य आणि समुपदेशन शिबिरे, अशी ७५ वेगवेगळी शिबिरे घेतली जात आहेत.या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री जाधव, आमदार मनीषा कायंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘तू भारत माता की शान है’ या गीताचे लोकार्पण करण्यात आले. त्याचबरोबर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि डॉ.अमोल शिंदे यांच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन, आभा कार्ड, आयुष्मान कार्ड वितरण, श्रीकांत शिंदे फॉउंडेशन मार्फत ७५ रूग्णवाहिकांचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन