अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या मदतीने मंदार शिंदेची मेणबत्ती, कापूर व्यवसायवृद्धी
सांगली :- महाराष्ट्रातील तरुणाई ही ऊर्जावान, कर्तृत्ववान आणि प्रगतीकामी आहे. त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळ मिळाल्यास “अनंत आमुचि ध्येयासक्ती, अनंत अन आशा, किनारा तुला पामराला”, या कवी कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्ती ही तरूणाई सिद्ध करते. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा लाभार्थी मंदार संजय शिंदे हाही त्यापैकीच एक युवक. मंदारचे वय अवघे 24. शिक्षण बी. टेक मेकॅनिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. त्याची टाटा कंपनीत निवडही झाली होती. पण, त्याला यशस्वी उद्योजक व्हायचं होतं. तरुणांनी नोकरी मागणारे न राहता रोजगार देणारे व्हावे, हा उद्देश असलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने त्याला मदतीचा हात दिला.मंदार शिंदेंच्या वडिलांनी खाजगी कंपनीत नोकरी केली आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. पण, त्याच्या काकांनी 25 वर्षांपूर्वी मेणबत्ती आणि कापराचा व्यवसाय सुरू केला. त्यांचे कष्ट, जिद्द आणि प्रयत्नांच्या जोरावर फुललेला व्यवसाय मंदारने लहानपासून पाहिला. त्यामुळे नोकरी व व्यवसायातील फरक लक्षात येवून मंदारमध्ये बालवयातच नकळत उद्योजक होण्याचे संस्कार पेरले गेले. शिक्षण पूर्ण होताच त्याने तात्काळ चालू व्यवसायाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आवश्यक ते आर्थिक पाठबळ कौटुंबिक मदतीशिवाय त्याला स्वतः उभे करायचे होते. या पार्श्वभूमिवर त्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची माहिती मिळाली. महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेचा लाभ घेऊन स्वप्नपूर्तीकडे त्याची वाटचाल सुरू आहे. त्याला भक्कम कौटुंबिक साथही मिळाली आहे. याबाबत मंदार शिंदे म्हणाला, माझे काका अनिल शिंदे यांनी 25 वर्षांपूर्वी मंदिरा कापूर आणि मंदार मेणबत्ती या नावाने व्यवसाय सुरू केला. पण, त्यावेळी आर्थिक परिस्थितीमुळे हा व्यवसाय मर्यादित स्वरूपात राहिला. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनरूज्जीवित झाल्यानंतर काकांनी व्याज परतावा योजनेतून 10 लाख रूपयांचे कर्ज घेतले. ते नियमित हप्ते भरून फेडले. व्याज परतावा योजनेचा लाभ घेतल्यामुळे आमची व्याजपरताव्यापोटी द्यावी लागणारी जवळपास 3 लाखांहून अधिक रक्कम वाचली असल्याचे त्यांनी सांगितले. मंदार शिंदे म्हणाला, काकांचे उदाहरण समोर असल्याने मीही व्याजपरतावा योजनेतून गेल्या वर्षी 15 लाख रूपये कर्ज घेतले आहे. त्यातून व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक चार अद्ययावत यंत्रे खरेदी केली व शेड बांधले. जुनी व नवीन मिळून आज आमच्याकडे मेणबत्ती तयार करण्यासाठी 14 यंत्रे तर कापूरवडी तयार करण्यासाठी 3 यंत्रे आहेत. आमच्याकडे 20 ते 22 कामगार काम करतात. वर्षभरात 70 टन मेणबत्ती तर 10 ते 15 टन कापूर अशी जवळपास दीड कोटी रूपयांची विक्री केली जाते. सांगलीसह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यात आमचे ग्राहक आहेत. कर्जाचे हप्ते नियमित फेडत असल्याने व्याजपरतावाही वेळेत मिळत आहे. आता आमचा केवळ व्यवसाय न राहता ब्रँड निर्माण करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत.एकूणच रोजगार निर्मिती, उद्योजकता व स्वावलंबनाच्या माध्यमातून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाने मंदार शिंदेच्या व्यवसायाला नवी दिशा दिली आहे. (संप्रदा बीडकर, जिल्हा माहिती अधिकारी, सांगली)
Comments
Post a Comment