त्र्यंबकेश्वर पत्रकार हल्ला प्रकरणी नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन
नाशिक :- त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ रजि. संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.याबाबत जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज सोमवार दि.२२ सप्टेंबर २०२५ रोजी निवेदन देण्यात आले. दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी (शनिवार) वार्तांकनासाठी त्र्यंबकेश्वर येथे गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे व पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने,यांच्यावर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक करत मारहाण केली.या हल्ल्यात किरण ताजने,गंभीर जखमी होऊन रुग्णालयात दाखल आहेत.पत्रकार संघटनांनी निवेदनात नमूद केले की, पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी बाब असून चौथ्या स्तंभावर घाला घालणारी कृती आहे. समाजातील प्रश्न व अन्याय प्रकाशात आणणाऱ्या पत्रकारांवर असे हल्ले होणे दुर्दैवी आहे.यावेळी पत्रकार संघटनेच्या वतीने निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या
सर्व हल्लेखोरांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने विशेष उपाययोजना कराव्यात.
भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस धोरण आखावे.
पत्रकारांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी गृह विभागाने लक्ष घालावे.
पत्रकारांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत
तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवत, पत्रकार-प्रशासन समन्वय समिती स्थापन करून नियमित बैठका घ्याव्यात अशी मागणी केली.
या निवेदनावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे, तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी,तालुका उपाध्यक्ष संजय परदेशी,भैय्यासाहेब कटारे,सुखदेव भालेराव,भाऊसाहेब बोराडे,दीपक आंबोरे, सुरेश निकुंभ,गणेश खरात,पंकज पाटील,विश्वास लचके,संदेश केदार, सुनिता पाटील, प्रकाश जोशी, द्यानेश्वर सुरासे, अनिल केदारे,संजय हिरे,सचिन गायकवाड,नासिर मन्सुरी,विजय बागुल, जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनेचे पदाधिकारी,न्यूज चॅनल, दैनिक,साप्ताहिक वृत्तपत्र, डिजिटल मीडिया संपादक व प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पत्रकारांवरील हल्ल्याविरोधात निवेदन दिले.पत्रकार संघाच्या वतीने सर्व हल्लेखोरांना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा व्हावी,तसेच पत्रकारांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात.अशी मागणी जिल्हा सरचिटणीस दिनेश ठोंबरे यांनी केली.तालुका अध्यक्ष करणसिंग बावरी यांनीही "जनतेसाठी झटणाऱ्या पत्रकारांवर वारंवार हल्ले होतात,पण प्रशासनाच्या वतीने काही वेळा योग्य कारवाई होत नाही त्याकरिताच सुरक्षेसाठी तातडीने समिती नेमली जावी अशीही मागणी करण्यात आली.
Comments
Post a Comment