समाज व विद्यार्थी घडविण्याचे कार्य शिक्षक करत असतात - अँड.नितीन ठाकरे
नाशिक :- प्रत्येकाच्या जीवनात मार्गदर्शक म्हणून आई-वडील, गुरु व शिक्षक यांचे मोलाचे स्थान असते. शालेय जीवनापासून ते महाविद्यालयीन जीवनापर्यंत विद्यार्थ्याचे शैक्षणिक तसेच बौद्धिक घडण शिक्षकांमार्फत होत असते. यातूनच समाज व विद्यार्थी घडविण्याचे काम शिक्षक करतात, असे प्रतिपादन मविप्र सरचिटणीस अँड.नितीन ठाकरे यांनी केले.के.टी.एच.एम. महाविद्यालयात आयोजित शिक्षक दिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे, उपप्राचार्य डॉ. एन. डी. गायकवाड, डॉ. वसंत बोरस्ते, प्रा. किरण रेडगावकर व प्रा. गावले उपस्थित होते. अँड.नितीन ठाकरे पुढे म्हणाले, “मविप्र संस्थेची १११ वर्षांपासून अविरत वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या कर्मवीर, देणगीदार यांच्याइतकाच जुन्या काळातील शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. वर्गखोल्या, इमारत नसतानाही शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण दिले. सध्या नव्या शैक्षणिक धोरणामुळे संशोधन व नावीन्यतेला महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन ज्ञान देण्यासाठी शिक्षकांनी स्वतःमध्येही बदल घडवणे आवश्यक आहे.या दृष्टीने संस्थेने मानव विकास संशोधन केंद्र स्थापन केले असून आयसर व आयुका सारख्या संस्थांच्या माध्यमातून शिक्षक प्रशिक्षण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. “भविष्यात निश्चितच चांगले शिक्षक घडतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.प्रास्ताविक करताना प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे म्हणाल्या की, “शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये मूल्य व संस्कार रुजवून गुणवत्तापूर्ण विद्यार्थी तयार करतात. शिस्त, नैतिकता व सद्गुण शिक्षकांच्या माध्यमातून रुजवल्याने विद्यार्थी आदर्श नागरिक म्हणून घडतो.”यावेळी पेटंट प्राप्त शिक्षक, पुस्तक लेखक, राज्यस्तरीय आपत्ती व्यवस्थापन शिबिरातील सहभाग, प्रजासत्ताक दिन नवी दिल्ली संचलनात सहभाग, पुणे विद्यापीठ अविष्कार स्पर्धेत प्रथम येणारे विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना तसेच पदवी व पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात प्रथम येणारे गुणवंत विद्यार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. तुषार पाटील यांनी केले. डॉ. छाया शिंदे यांनी बक्षीस वितरणाची यादी वाचली, तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य डॉ. वसंत बोरस्ते यांनी केले.
Comments
Post a Comment