तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुढे न्या - मंत्री छगन भुजबळ
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारीला लागा - मंत्री छगन भुजबळ
नागपूर,दि.१९ सप्टेंबर:- लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. त्यासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तयार असायला हवे. या काळात आपल्यावर अनेक हल्ले होतील मात्र न घाबरता न डगमगता आपल्याला त्यावर प्रतिहल्ला करावा लागणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. त्यामुळे तुफानातले दिवे होऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीला पुढे न्यायचे आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे चिंतन शिबीर नागपूर येथे पार पडले. या शिबिराच्या उद्दघाटन प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना मंत्री छगन भुजबळ बोलत होते. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, कार्याध्यक्ष खा.प्रफुल्ल पटेल, प्रांताध्यक्ष खा.सुनील तटकरे यांच्यासह राज्यमंत्री मंडळातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे मंत्री, आमदार, खासदार व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, हे चिंतन शिबिर एका विशिष्ट परिस्थितीत होत असून थोड्याच दिवसांमध्ये आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरं जायचं आहे. या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणुकांना सामोरं जात असताना आपण कुठले मुद्दे घेऊन जाणार आहोत याचं मार्गदर्शन होणं अपेक्षित आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी हा फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष आहे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जायचे आहे. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तयारी राहिली पाहिजे. राज्यातील जनतेला काय अपेक्षित आहे. त्यादृष्टीने त्यांच्या सुख दु:खात सहभागी होऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. निवडणुकांच्या तोंडावर आपल्यावर अनेक हल्ले होणार आहे. त्या हल्ल्यांना घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. त्यावर आपल्याला प्रतिहल्ले करावे लागणार आहे.
ते म्हणाले की, राज्य,जिल्हा किंवा एखाद्या मोठ्या शहराच्या कल्याणासाठी निवडणूक होत असताना आपल्या कार्यकर्त्यांची काय बोलायचं, कोणता मुद्दा पक्षाच्या व तुमच्या फायद्याचा आहे त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. नुकसानीचे मुद्दे थोडे बाजूला ठेवले पाहिजेत.जिंकून येण्यासाठी फक्त पक्षाचं लेबल आपल्याला पुरेसं नसून तुमचा मतदारसंघ, शहर किंवा जिल्हा परिषदेमध्ये झटून काम कराव लागेल. पक्ष तुमच्याबरोबर असेलच, परंतु तुमची मतदारसंघामधील उपस्थिती जास्त महत्त्वाची आहे, तरच मतदार आपल्याला जवळ करतील. गेल्या लोकसभेमध्ये आपण थोडेसे बॅकफुटवर गेलो, पण ताबडतोब सावरलो.विधानसभेत महायुतीचे मोठ्या संख्येने आमदार निवडून आले, आपण सरकार बनवलं आणि चांगले उत्तम निर्णय घेतले. त्या त्या विभागातील, जिल्ह्यातील तसेच राज्याचे सार्वत्रिक निर्णय काय आहेत हे आपल्याला माहिती असायला हवे. टीका करणाऱ्यांना काय उत्तर द्यायचं, हे माहिती असलं पाहिजे. जिंकण्याची जिद्द ठेवून आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पुढे न्यायचा असे आवाहन त्यांनी केले.
Comments
Post a Comment