प्रा अनिल बनसोडे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार
दिंडोरी :- कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय भिगवन ता इंदापूर येथील प्राध्यापक अनिल चांगदेव बनसोडे यांना सन 2021/22 साठी राष्ट्रीय सेवा योजना यशस्वीपणे राबवून भरीव योगदानाबद्दल महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार जाहीर झाल्याचे नुकतेच सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांनी जाहीर केले आहे.
विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून दत्तक ग्राम विकास करण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन, बंधारे बांधणी, ग्रामस्वच्छता, जल प्रबोधन, नद्या- ओढे स्वच्छता, गावांचं ऐतिहासिक सर्व्हेक्षण, मतदान जनजागृती, लोकसंख्या नियंत्रण जनजागृती, ग्राम व शहर विकास आदी विषयांवर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांच्या माध्यमातून विविध प्रबोधनपर पथनाट्यांचे यशस्वीपणे सादरीकरण केले आहे.
याचबरोबर अनेक ग्रामीण भागातील स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांना विद्यापीठ, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेकविध शिबिरांत सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन करून पाठवले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन व्यक्तिमत्त्व विकास साधला जावा यासाठी प्रा डॉ अनिल बनसोडे हे अविरतपणे प्रयत्न करत आहेत.
तसेच, प्रा अनिल बनसोडे यांनी महाराष्ट्र शासनाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी ट्रेनिंग अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर येथे यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
प्रा. अनिल बनसोडे यांची "विभाग समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे" या पदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. विभाग समन्वयक या नात्याने राष्ट्रीय सेवा योजनेचे नेटके आयोजन विविध महाविद्यालयांतील युनिट मध्ये पार पाडण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचे काम करत आहेत.
जिल्हा समन्वयकांसाठी आयोजित "सहज जलबोध कार्यशाळा", "राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी अधिवेशन", "सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी सर्व्हेक्षण कार्यशाळा", "समान लिंगभाव कार्यशाळा" आदी शिबीरे आणि कार्यशाळांच्या आयोजनामध्ये प्रा अनिल बनसोडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
प्रा अनिल बनसोडे हे संत जनार्दन स्वामी आंतरराष्ट्रीय मिशन नवी दिल्ली या संस्थेचे संस्थापक सचिव (विश्वस्त) असल्याने, महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार त्यांना जाहीर झाल्याबद्दल संस्थेच्या सर्व विश्वस्तांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment