डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन निर्वाण-२०२४ संपन्न
फोटो : आडगाव येथील डॉ वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आय एम ए चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र वानखेडकर व व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन निर्वाण-२०२४ नुकतेच संपन्न झाले.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे व कार्यकारिणी सदस्य, संचालक मंडळ, शिक्षणाधिकारी डॉ ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधिर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात यंदा निर्वाण-२०२४ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. समारोपीय कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष व धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शल्यचिकित्सा विभागाचे प्राध्यापक डॉ. रवींद्र वानखेडकर, सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ.ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ सुधीर भामरे, उपवैद्यकीय अधीक्षक कल्पना देवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन तसेच संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीरांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. सरस्वती वंदना करण्यात येऊन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे यांनी महाविद्यालयाच्या वार्षिक कामगिरीचा अहवाल सादर केला. सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी गुणवंत शिक्षक विद्यार्थी यांचे अभिनंदन करत विद्यार्थी व रुग्ण केंद्रबिंदू मानून मविप्र संस्था ही डॉक्टर वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. रवींद्र वानखेडकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वैद्यकीय शिक्षण आणि संधी यावर विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले. वार्षिक स्नेहसंमेलन निमित्ताने वर्षभरात वैद्यकीय संशोधन, शैक्षणिक,सांस्कृतिक व क्रीडा,कला या विभागांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक समितीचे प्रमुख प्राध्यापक मिलिंद देशपांडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. रचना चिंधडे व विद्यार्थी प्रतिनिधी प्राची पाटील हिने केले. कार्यक्रमास एमबीबीएसच्या सर्व वर्षातील विद्यार्थी, विभाग प्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बक्षिस समारंभानंतर विद्यार्थ्यां कडून विविध गुणदर्शनांचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. त्याने सर्व मान्यवरांची आणि उपस्थितांची मने जिंकली.
Comments
Post a Comment