माध्यम क्षेत्रात व्यवसायाच्या अनेक संधी - ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर
केटीएचएमच्या एमए पत्रकारिता विभागातर्फे व्याख्यान
मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयातील एमए पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागातर्फे आयोजित व्याख्यानाप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर. समवेत विभागप्रमुख प्रा.प्राची पिसोळकर, प्रा. योगेशकुमार होले, प्रा. काजल भोसले व विद्यार्थी
-------------------------------------------------------------------
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- लोकांपर्यंत माहिती व मनोरंजन पोहोचविण्यासाठी सोशल मिडियाचा वापर करून व्यवसाय करणे म्हणजेच माध्यम उद्योजकता होय. यामधील व्यवसायाच्या विविध संधी ओळखता आल्या पाहिजे. त्यासाठी मेहनत, आत्मविश्वास व तांत्रिक कौशल्य हेदेखील महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर यांनी व्यक्त केले.मविप्र संस्थेच्या केटीएचएम महाविद्यालयातील एमए पदवीव्यूत्तर पत्रकारिता व जनसंज्ञापन विभागातर्फे आयोजित ‘द गेटवे ऑफ कम्यूनिकेशन बिझनेस : मिडिया इंटरप्रिनरशिप’ या विषयावर ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते.अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. व्ही. बी. बोरस्ते होते. यावेळी पत्रकारिता विभागप्रमुख प्रा.प्राची पिसोळकर, प्रा.योगेशकुमार होले, मास मिडिया विभागप्रमुख प्रा. गोकुळ सानप,उपस्थित होते.यावेळी ते म्हणाले, माहिती आणि मनोरंजनाच्या क्षेत्रात नवनवीन आणि आकर्षक कल्पना शोधणे व त्या प्रत्यक्षात आणणे. या कल्पनांना व्यवसाय म्हणून संघटित करणे आणि एका संस्थेच्या रूपात उभे करणे. या व्यवसायात यश मिळवण्यासाठी स्पर्धेलाही सामोरे जावे लागेल. व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक असलेले भांडवल, मनुष्यबळ आणि तांत्रिक कौशल्ये या गोष्टींची योग्य जुळवाजुळव करावी लागेल. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सोशल मिडियाच्या युट्यूब, इंस्टाग्राम आदी माध्यमांतून पुढे जाता येईल,असे देवकर यांनी सांगितले.पत्रकारितेच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरी सोबतच व्यवसायाच्याही विविध संधी आहेत, मात्र त्या संधींसाठी आपल्याला विविध तांत्रिक कौशल्ये, ज्ञान हस्तगत करावे लागेल, असे आपल्या अध्यक्षीय मनोगतात उपप्राचार्य डॉ. व्ही. बी.बोरस्ते यांनी सांगितले. या व्याख्यानासाठी प्राचार्या डॉ. श्रीमती कल्पना आहिरे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. प्राची पिसोळकर यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. आरती मंत्री यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment