मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १ हजार ३५२ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण



नाईकबंबवाडी औद्योगिक वसाहतीत 'मेगा प्रोजेक्ट' देऊ - मुख्यमंत्री

सातारा, दि. २६ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फलटण येथे नीरा देवघर प्रकल्पाच्या उजवा मुख्य कालव्याच्या दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभासह १ हजार ३५२ कोटी रुपये रकमेच्या विविध विकासकामांचे ऑनलाईन भूमिपूजन व लोकार्पण करण्यात आले. फलटण शिंगणापूर रस्त्यावरील नाईकबंबवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहतीमध्ये एक मोठा (मेगा) औद्योगिक प्रकल्प देण्यासह तालुका व परिसरातील विविध विकास कामे सुरू करण्यात येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.
फलटण येथे आयोजित भूमिपूजन कार्यक्रम व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आदी उपस्थित होते. फलटण ही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, शासनाने या परिसराला दुष्काळमुक्त करण्यासाठी नीरा देवघर कालव्याच्या कामातील अडचणी दूर करून कामाला सुरुवात केली आणि प्रकल्पाचे पाणी फलटण आणि माळशिरसला देणे शक्य करून दाखविले आहे. माणदेशाच्या साहित्यात दुष्काळावरील चित्रण दिसून येते, हा दुष्काळ दूर करण्याचे काम शासनाने हाती घेतले असून सर्व कामे पूर्ण झाल्यावर हरित माणदेश तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दुष्काळमुक्ती हाच ध्यास

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नीरा देवघर, जिहे कटापूर, टेंभू उपसा योजनेचे वेगवेगळे टप्प्यातून दुष्काळी तालुक्यांना पाणी दिले आहे. सांगोल्यासारख्या दुष्काळी भागात पाणी पोहोचविण्यात आले आहे. माळशिरस तालुक्यातील पाण्यापासून वंचित २२ गावांना पाणी देण्यात येईल. नीरा देवघर प्रकल्पातील तीन उपसा सिंचन योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. या परिसराच्या विकासासाठी आणि दुष्काळमुक्तीसाठी शासन येथील जनतेच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

फलटण परिसराचा सर्वांगीण विकास करणार

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या सर्व सुविधा फलटण शहरात आल्या आहेत. प्रशासकीय इमारत, पोलीस ठाणे, न्यायालय आदींच्या माध्यमातून नागरिकांचे जीवन सुकर होणार आहे. येथील विविध विकास कामांना चालना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून पाडेगाव – साखरवाडी – जिंती – फलटण – शिंगणापूर रस्ता करण्यात येईल. माणगंगा नदीचा समावेश अमृत २ मध्ये करण्यात येईल आणि फलटण येथे न्यायालयासाठी स्वतंत्र इमारत उभारण्यात येईल. फलटण येथील विमानतळाच्या अनुषंगाने सर्वेक्षण करण्यात येईल. फलटण येथील रुग्णालयातील सुविधा अद्ययावत करण्यात येतील, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासन कार्यरत आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना आणि शेतकऱ्यांची वीज बील माफीसारखी योजना सुरू राहील. सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना दिवसा वीज मोफत देण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर नेण्यात येतील, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, फलटण परिसराच्या दुष्काळ मुक्तीसाठी शासनाने महत्वाचे निर्णय तसेच प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामुळे माण, खटाव आणि फलटण परिसरातील दुष्काळ दूर होणार आहे. नीरा देवधर प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. अनेक योजना मार्गी लागत असून फलटणच्या विकासाचा मार्ग त्यामुळे खुला झाला आहे. उद्योग, वाहतूक आदी क्षेत्रातही विकासाला चालना मिळाली आहे. असे त्यांनी सांगितले.

आमदार सचिन पाटील यांनी आपल्या मनोगतात फलटण तालुक्यात अनेक विकासकामे होत असल्याचे नमूद केले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या मनोगतात तालुका व परिसरात झालेल्या व हाती घेण्यात आलेल्या विकासकामांविषयी माहिती दिली.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शुभारंभ, लोकार्पण होणाऱ्या विविध विकासकामांची माहिती दिली. सुमारे १ हजार ४०० कोटी रुपयांच्या विकासकामांमुळे येथील शेती आणि उद्योग क्षेत्राला चालना मिळेल व परिसराचा सर्वांगीण विकास होईल. नीरा देवधर उजव्या कालव्याच्या दुसऱ्या टप्प्यातील कामामुळे १२ हजार हेक्टर क्षेत्रातील शेतीला फायदा होऊन शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सचिन पाटील, मनोज घोरपडे, अतुल भोसले, राहुल कुल, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, माजी आमदार राम सातपुते आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात झालेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन, शुभारंभ व लोकार्पण :
नीरा देवघर प्रकल्प उजवा मुख्य कालवा टप्पा २ किमी ८७ ते १३४ पर्यंत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करणे (लाभ क्षेत्र १२ हजार ३१४ हे.) कामाचा कार्यारंभ- निविदा किंमत ९६७ कोटी रुपये प्रशासकीय भवन या नवीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन तथा कार्यारंभ सोहळा – रक्कम १८ कोटी ६९ लाख रुपये
महसूल भवन या नवीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन तथा कार्यारंभ सोहळा – रक्कम ९ कोटी ७५ लाख रुपये
फलटण शहरांतर्गत होणारा नवीन कॉक्रिट पालखी मार्ग कामाचा कार्यारंभ -रक्कम ७५ कोटी रुपये
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर असणाऱ्या २० कोटी निधीचा ३ रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ.
आसू-फलटण-गिरवी या एम.एस.आय.डी.सी. योजनेतून सुरू असणाऱ्या एकूण ५० कि. मी. लांबीच्या व १९८ कोटी रुपये किमतीच्या काँक्रिट रस्त्याच्या कामापैकी फलटण ते गिरवी या पूर्णपणे बांधून झालेल्या रस्त्याचे लोकार्पण.
फलटण शहर पोलीस ठाणे,फलटण ग्रामीण पोलीस ठाणे, तसेच वाठार स्टेशन येथे बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस ठाणे इमारतींचे लोकार्पण – किंमत प्रत्येकी १२ कोटी २८ लाख ३६ हजार ९३२ रुपये (९ हजार ५०० स्क्वे. फूट)
फलटण येथे बांधण्यात आलेल्या ८७ पोलीस कर्मचारी निवास इमारतींचे लोकार्पण- रक्कम २७ कोटी ११ लाख ४८ हजार ६७७ रुपये (८० हजार स्क्वे. फूट)
कार्यक्रमात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यात पी. एम. जनमन योजनेंतर्गत घरकुल लाभ, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या लाभार्थ्यांना लाभ प्रमाणपत्र, फळबाग लागवड व सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट कामाबद्दल सन्मान, उत्कृष्ट बचत गट, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यांना सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन