कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांच्या आश्वासनानंतर कृषी सहायकांचे आंदोलन मागे


कृषी सहायकांचे पदनाम आता ‘सहायक कृषी अधिकारी’ करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता


मुंबई, दि. २७ : राज्यातील कृषी सहायक संवर्गाच्या विविध अडचणी व मागण्यांसंदर्भात शासन सकारात्मक असून त्यांच्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे यांनी पर्यवेक्षकांच्या शिष्‍टमंडळाला सांगितल्यानंतर कृषी सहायकांनी पुकारलेले बेमुदत काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे म्हणाले, कृषी विभागात कृषी सहायक या संवर्गातील कर्मचाऱ्यांचे मोठे महत्त्व आहे.  शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने आणि खरीपाचा हंगाम सुरू होत असल्याने कृषी सहायकांनी आंदोलन करणे उचित होणार नाही. त्यांच्या विविध अडचणींबाबत शासन सकारात्मकतेने विचार करीत असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे. सुरूवात म्हणून कृषी सहायकांच्या पदनामामध्ये ‘सहायक कृषी अधिकारी’ असा बदल करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे सध्याची पावसाची स्थिती आणि खरीप हंगाम पाहता शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता विचारात घेऊन कृषी सहायकांनी आंदोलनाचा निर्णय स्थगित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी सहायकांचे सुरू असलेले आंदोलन स्थगित करीत असल्याचे महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष विलास रिढे आणि सरचिटणीस महेंद्र गजभिये यांनी यावेळी जाहीर केले.

शासनाकडून  महाराष्ट्र राज्य कृषि सहायक संघटनेच्या न्याय मागण्याची दखल घेऊन मागण्यांची सोडवणूक केली जाणार असल्याबद्दल महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे व कृषी मंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले.

संघटनेस संप मागे घेण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार, संघटनेने आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देऊन पुकारलेला संप स्थगित करीत आहे असे यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील कृषी सहायक संघटनेचे सर्व सदस्य दि. २७ मे २०२५ पासून पूर्ववत कामावर रुजू होऊन नियमित कामकाज करणार आहेत असे संघटनेकडून  सांगण्यात आले आहे.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन