महाराष्ट्रातील बंदर विकासाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय मान्यता

मंत्री नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट

उर्वरित १३ प्रकल्पांनाही लवकरात लवकर मंजुरीचे आश्वासन
नवी दिल्ली, दि. २९: महाराष्ट्रातील बंदर विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या ४२ प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली असून, उर्वरित १३ प्रकल्प तातडीने मंजूर करावेत, अशी मागणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली आहे.



केंद्रीय पर्यावरण विभागाकडे महाराष्ट्रातील बंदरे विकास मंत्रालयाच्या विविध विकास कामांच्या प्रलंबित परवानगीना तातडीने मंजुरी देण्याबाबत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री भूपेंद्र यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. महाराष्ट्रातील प्रलंबित विकास परवानगींना तातडीने मंजुरी देण्याची मागणी यावेळी त्यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे केली. केंद्रीय मंत्री यादव यांनी देखील मंत्री राणे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित परवानगी तसेच विविध विकास कामे त्वरित पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दिले.

दिल्लीतील भेटीत मंत्री राणे यांनी महाराष्ट्रातील विकास कामांमध्ये अडथळा ठरत असलेल्या सीआरझेड मोजणी नकाशे अद्याप मिळाले नसल्याकडे लक्ष वेधले. हे नकाशे मिळण्यासाठी महाराष्ट्राने आवश्यक शुल्क अदा करूनही चेन्नईच्या राष्ट्रीय कोस्टल मॅनेजमेंट केंद्राकडून मान्यता मिळालेली नाही.

केंद्रीय मंत्री यादव यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत, उर्वरित १३ प्रकल्पांना लवकरात लवकर मंजुरी देण्याचे आश्वासन दिले. यानंतर मंत्री राणे यांनी पर्यावरण भवन येथे केंद्रीय सचिव तन्मय कुमार यांचीही भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

राज्य शासनाच्या बंदरे विकास विभागाच्या प्रकल्पांना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळण्यासाठी सीआरझेडचे मोजणी नकाशे चेन्नई येथील मुख्यालयातून राज्य शासनाला मिळणे अत्यंत आवश्यक असते या सीआरझेड मोजणी नकाशांशिवाय केंद्रीय पर्यावरण खात्याकडे तसेच सीआरझेड बाबत ना हरकत दाखला मिळण्यासाठी अर्जच करता येत नाहीत ही बाब देखील मंत्री राणे यांनी केंद्रीय मंत्री यादव यांच्या निदर्शनास आणून दिली.

या सर्वाचा परिणाम हा शेवटी प्रकल्पांच्या किमती वाढण्यामध्ये होत आहे याकडे लक्ष वेधत महाराष्ट्रातील अशा तेरा प्रकल्पांच्या परवानगी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे गेले वर्षभर सीआरझेडच्या नकाशा अभावी प्रलंबित आहेत. आतापर्यंत केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्रातील बेचाळीस प्रकल्पांना याबाबत मान्यता दिल्याचे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले आणि त्याबद्दल केंद्रीय मंत्री यादव यांचे आभार देखील व्यक्त केले. त्याचबरोबर उर्वरित तेरा प्रकल्पांच्या परवानगी बाबत तातडीने मान्यता देण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी त्यांच्याकडे केली. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री यादव यांनी दिले.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन