केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पाकिस्तान आणि नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती राज्यांच्या नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसोबत सुरक्षा स्थितीची आढावा बैठक

बैठकीला उपस्थित असलेल्या सर्व मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी आणि तिन्ही सशस्त्र दलांचे केले अभिनंदन

ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम दहशतवादी हल्ल्याला योग्य प्रतिसाद देण्यात आला आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाला एक ठोस संदेश मिळाला आहे.

ऑपरेशन सिंदूरने संपूर्ण जगाला दहशतवादाविरुद्ध मोदी सरकारच्या शून्य-सहिष्णुतेच्या धोरणाचे घडवले दर्शन

रुग्णालये, अग्निशमन सेवा इत्यादी अत्यावश्यक सेवांचे कामकाज सुरळीत सुरू राहील याकडे लक्ष द्या; अत्यावश्यक वस्तूंचा विनाव्यत्यय पुरवठा सुनिश्चित करा.

गृहमंत्र्यांनी राज्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एसडीआरएफ, नागरी संरक्षण, गृहरक्षक, एनसीसी इत्यादींना सज्ज ठेवण्याचे दिले निर्देश

नवी दिल्‍ली, 7 मे 2025 :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली येथे पाकिस्तान आणि नेपाळला लागून असलेल्या सीमावर्ती राज्यांच्या नायब राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांसोबत सुरक्षा स्थितीच्या आढावा बैठकीचे अध्यक्षपद भूषवले. या बैठकीला जम्मू आणि काश्मीर आणि लडाखचे नायब राज्यपाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि सिक्कीम सरकारचा प्रतिनिधी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. केंद्रीय गृह सचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकांसह गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, 22 एप्रिल, 2025 रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या निर्दयी दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते की, देश या दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगारांना आणि त्याच्या समर्थकांना चोख प्रत्युत्तर देईल. ऑपरेशन सिंदूरबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृढ निर्धार आणि निर्णयाबद्दल गृहमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या सीमा, सैन्य आणि नागरिकांना आव्हान देण्याचे धाडस करणाऱ्यांना भारताकडून सडेतोड उत्तर आहे. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांनी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल पंतप्रधान मोदी आणि तिन्ही सशस्त्र दलांचे अभिनंदन केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याकडे दुर्लक्ष न करता, ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून योग्य प्रत्युत्तर देण्यात आले, ज्यामुळे जगाला एक मजबूत संदेश मिळाला. विशिष्ट माहितीच्या आधारावर भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवादी गटांविरोधात केलेले ऑपरेशन सिंदूर हे मोदी सरकारच्या दहशतवादा विरोधातील शून्य सहिष्णुता धोरणाचा संपूर्ण जगासमोर ठेवलेला पुरावा आहे, असे ते म्हणाले. यावेळी संपूर्ण देशाने दाखवलेल्या एकजुटीमुळे देशवासीयांचे मनोबल उंचावले असे केंद्रीय मंत्री म्हणाले.

अमित शहा म्हणाले की, 6-7 मे 2025 च्या मध्यरात्री भारतीय सैन्याने दहशतवाद्यांशी संबंधित नऊ विशिष्ट ठिकाणांवर हल्ले केले आणि त्यांच्या पायाभूत सुविधा उद्ध्वस्त केल्या. गृहमंत्री म्हणाले की, भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईत लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन आणि इतर दहशतवादी गटांसारख्या संघटनांची दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे, शस्त्रास्त्रांचे तळ आणि लपण्याच्या जागा पूर्णपणे नष्ट करण्यात आल्या. मॉक ड्रिलसाठी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व राज्यांनी आपली तयारी करावी, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले. रुग्णालये, अग्निशमन दल इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच अत्यावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा राहील, याची खात्री करावी, असे त्यांनी सांगितले. गृहमंत्र्यांनी राज्यांना कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एसडीआरएफ, नागरी संरक्षण, गृहरक्षक दल, एनसीसी इत्यादी संस्थांना सतर्क ठेवण्याची सूचना केली. नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून लोकसहभाग मिळवण्याचा प्रयत्न करावा असे ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, सोशल मिडिया आणि इतर माध्यमांवर समाज कंटकांकडून होणाऱ्या देशविरोधी प्रचारावर कडक नजर ठेवावी आणि राज्य सरकारे आणि केंद्रीय संस्थांशी समन्वय साधून त्यांच्या विरोधात त्वरित कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले. सुरळीत संवाद राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत आणि संवेदनशील ठिकाणांची सुरक्षा देखील अधिक मजबूत करावी, असे गृहमंत्री म्हणाले. राज्यांनी जनतेमध्ये अनावश्यक भीती पसरवणे थांबवावे आणि अफवांच्या विरोधात लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. स्थानिक प्रशासन, लष्कर आणि निमलष्करी दलांमधील समन्वय आणखी वाढवायला हवा असे ते म्हणाले.

 

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन