पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य अनमोल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



‘लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
मुंबई, दि. 28 :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी कार्यातून राज्यकारभार केला. संपूर्ण देशभरात त्यांनी मंदिरांची पुननिर्मिती व घाटांची बांधणी केली, त्यांनी तयार केलेल्या विहिरी, तलाव यांचे संवर्धन करण्याचे काम राज्य शासन करणार आहे. त्यांचे कार्य अनमोल असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त सोशल स्टडीज फाऊंडेशन निर्मित “लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम” या कॉफी टेबल बुकच्या प्रकाशन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती तथा ‘मॅट’च्या अध्यक्ष मृदुला भाटकर, कवी प्रसून जोशी, कॉफी टेबल बुकचे संपादक अम्बरिश मिश्रा, सत्यप्रकाश मिश्रा, अविनाश मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी निमित्त त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे मंत्रिमंडळ बैठक घेऊन राज्यातील प्रमुख ज्योतिर्लिंगांचे आणि पंढरपूरसारख्या देवस्थानांचे जीर्णोद्धार आराखडे मंजूर करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्याचे ‘अहिल्यानगर’ असे नामकरण करण्यात आले आहे. अहिल्यादेवींच्या जीवनावर एक दर्जेदार व्यावसायिक चित्रपट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटातून त्यांच्या शौर्याची आणि कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याविषयीची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. लोकांना त्यांच्या जीवनातील काही पैलू माहिती असतीलही, पण त्यांच्या जीवनाचे बहुआयामी दर्शन हे लोकमाता अहिल्याबाई होळकर अन इटरनल फ्लेम या पुस्तकातून घडले, हे केवळ पुस्तक नसून आपल्या संस्कृतीचा ठेवा असल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी म्हणाल्या, काशी, अयोध्या, सोमनाथसारख्या धार्मिक स्थळांच्या पुनर्विकासात अहिल्यादेवींचे ऐतिहासिक योगदानही आहे. ‘इटरनल फ्लेम’ या पुस्तकातून त्यांच्या नेतृत्वगुणांचा आढावा घेण्यात आला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपण पुढे जात आहोत. इतिहासात ‘प्रगतीशील राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहिल्यादेवींवरील हे पुस्तक त्यांच्या नेतृत्वगुणांवर भाष्य करते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन