2024-25 या आर्थिक वर्षात भारतात 81.04 अब्ज अमेरिकी डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक
नवी दिल्ली, 27 मे :- सरकारने सुरू केलेल्या गुंतवणूकदारस्नेही थेट परदेशी गुंतवणूक (एफडीआय) धोरणाअंतर्गत 100 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीसाठी बहुतांश क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे एफडीआयमध्ये नियमितपणे वाढ होत आहे. 2013-14 या आर्थिक वर्षातली 36.05 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक 2023-24 या आर्थिक वर्षात 71.28 अब्ज अमेरिकी डॉलर्सवर गेली आणि 2024-25 या आर्थिक वर्षात ती 14 टक्क्यांनी वाढून 81.04 अब्ज डॉलर्सवर गेली आहे.
2024-25 या आर्थिक वर्षात सेवा क्षेत्रात सर्वात जास्त म्हणजे एकूण थेट परदेशी गुंतवणुकीच्या 19 टक्के इतकी गुंतवणूक झाली आहे. त्याखालोखाल कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर (16 टक्के) व व्यापार (8 टक्के) क्षेत्रातील गुंतवणूक आहे. सेवा क्षेत्रातील गेल्या वर्षाच्या 6.64 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणुकीत 40.77 टक्क्यांनी वाढ होऊन ती यावर्षी 9.35 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली आहे. भारत उत्पादन क्षेत्रातील थेट परदेशी गुंतवणुकीचेही प्रमुख केंद्र ठरत आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये ही गुंतवणूक 16.12 अब्ज अमेरिकी डॉलर्स होती ती 18 टक्क्यांनी वाढून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 19.04 अब्ज अमेरिकी डॉलर्स झाली आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मधील परदेशी थेट गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा सर्वात जास्त (39 टक्के) आहे. कर्नाटक (13 टक्के) व दिल्ली (12 टक्के) दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. गुंतवणूक करणाऱ्या देशांमध्ये सिंगापूरमधून सर्वात जास्त 30 टक्के आणि त्याखालोखाल मॉरीशस (17 टक्के) व अमेरिका (11 टक्के) या देशांमधून भारतात गुंतवणूक केली गेली आहे.
गेल्या अकरा आर्थिक वर्षांमध्ये मिळून (2014-2025) भारतात 748.78 अब्ज अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक झाली आहे. त्यापूर्वीच्या अकरा वर्षांमधील (2003-2014) 303.38 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या गुंतवणूकीपेक्षा ती 143 टक्क्यांनी जास्त आहे. गेल्या 25 वर्षांमधील 1072.36 अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीच्या सुमारे 70 टक्के गुंतवणूक 2014-25 या काळात झाली आहे.
याशिवाय परदेशी थेट गुंतवणूकदार देशांची संख्यादेखील वाढली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये ही संख्या 89 होती, 2024-25 मध्ये ती 112 झाली आहे.
Comments
Post a Comment