आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी - आ.पंकज भुजबळ
आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी ; पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार पंकज भुजबळ यांची सभागृहात मागणी
रामकुंड परिसरात जिवंत पाण्याचे स्रोत असल्याने येथे करण्यात आलेले काँक्रीटीकरण काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करा - आमदार पंकज भुजबळ
मुंबई,नाशिक,दि.९ जुलै :- नाशिकमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीने गोदावरी नदी स्वच्छतेसह रस्ते पुलांची कामे नियोजित वेळेत करण्यात यावी. तसेच रामकुंड परिसरात जिवंत पाण्याचे स्रोत असल्याने येथे करण्यात आलेले काँक्रीटीकरण काढण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार पंकज भुजबळ यांनी आज विधिमंडळाच्या सभागृहात केली. राज्याचे पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करतांना आमदार पंकज भुजबळ यांनी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्याबाबत मागण्या मांडल्या.
यावेळी आमदार पंकज भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र राज्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेत सिंहस्थ कुंभमेळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दर १२ वर्षांनी नाशिकमध्ये भरणारा सिंहस्थ कुंभमेळा हा केवळ धार्मिक उत्सव नसून, एक व्यापक व्यवस्थापनाचा आणि लोकसहभागाचा महामेळा असतो. देश-विदेशातून लाखो भाविक या कुंभमेळ्यात सहभागी होतात. त्यामुळे या कुंभमेळ्याचं नियोजन, अंमलबजावणी, सार्वजनिक सुविधा, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा आणि पर्यावरणाचा समतोल राखणं हे राज्य सरकारचं अत्यंत महत्त्वाचं कर्तव्य आहे. याच पार्श्वभूमीवर, पुरवणी मागणीद्वारे सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी १ हजार कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे, ही बाब अत्यंत स्वागतार्ह आहे. मात्र, या निधीचा उपयोग अत्यंत पारदर्शक, काळानुरूप आणि दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवून होणं आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते, पुल, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था आणि तात्पुरती निवास व्यवस्था यासाठी उच्च दर्जाची कामं व्हावीत.भाविकांची सुरक्षितता लक्षात घेता आपत्ती व्यवस्थापन, पोलीस बंदोबस्त, ड्रोन व सीसीटीव्ही यंत्रणा यांचा प्रभावी वापर व्हावा. आरोग्य सेवा चांगली मिळावी यासाठी तात्पुरते रुग्णालय, मोबाईल अॅम्ब्युलन्स, वैद्यकीय चमू यांची पुरेशी उपलब्धता असावी. गोदावरी नदीची शुद्धता, कचरा व्यवस्थापन आणि हरित उपाययोजनांना प्राधान्य द्यावं. तसेच आगामी कुंभमेळ्यात नाशिकमधील स्थानिक उद्योजक, कलाकार, स्वयंसेवी संस्था यांचा समावेश करून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना द्यावी अशी मागणी आमदार पंकज भुजबळ यांनी सभागृहात केली.
Comments
Post a Comment