शहापूरच्या शाळेची मान्यता रद्द झाली तरी मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये - महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर

शहापूर, दिनांक १० जुलै : शहापूरच्या शाळेत घडलेल्या आक्षेपार्ह प्रकारानंतर शाळेची मान्यता रद्द करण्याची कारवाई शिक्षण विभाग करेल मात्र यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही सुरू करावी. तसेच पोलिसांनी पालकांना विश्वासात घेऊन सखोल तपास करावा, असे निर्देश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.शहापूरच्या शाळेत स्वच्छतागृहात मासिक पाळीचे रक्त आढळल्याने मुख्याध्यापिकांनी महिला सफाईगारामार्फत सर्व मुलींची आक्षेपार्ह शारीरिक तपासणी केली. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती रूपाली चाकणकर यांनी आज शहापूर मध्ये पालकांची भेट घेतली. त्यानंतर शिक्षण विभागाचे अधिकारी आणि पोलीस ठाण्यात जाऊन आतापर्यंतच्या तपासाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.पालकांचे म्हणणे तसेच शिक्षण विभाग, पोलिस तपासाचा आढावा घेतल्यानंतर श्रीमती चाकणकर म्हणाल्या, शिक्षणाधिकारी यांनी शाळेची तपासणी केल्यानंतर शाळेत तक्रार निवारण समिती नसणे, सखी सावित्री समिती केवळ रजिस्टर नोंद असणे अशा अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. या गंभीर घटनेतील आरोपी मुख्याध्यापिका यांना निलंबित करण्यात आले आहे. तपासणी नंतर शिक्षणाधिकारी यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. मात्र मान्यता रद्द झाल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते. तेव्हा सोमवार पासून स्वतंत्रपणे पुन्हा शाळा सुरू करणेबाबत कार्यवाही करावी अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. पोलिस आढावा बैठकीत, ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ५ जण अटकेत आहेत. त्यांना १५ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. उर्वरित ३ जणांची पोलिस चौकशी करण्यात येत आहे असे पोलिसांनी सांगितले. दोन विश्वस्त यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र इतर दोन विश्वस्त यांनाही आरोपी करण्याची मागणी करत पालकांनी या आधी घडलेल्या काही घटना सांगितल्या आहेत. याबाबत उद्याच पोलिस, पालक, शिक्षण विभाग यांची बैठक घेऊन पालकांच्या तक्रारी जाणून घेत सखोल तपास करावा, अशा सूचना श्रीमती चाकणकर यांनी पोलिसांना दिल्या आहेत. याप्रकरणी तपास जलद गतीने पूर्ण करत दोषारोपपत्र दाखल करण्याचे ही निर्देश त्यांनी दिले.
अपमानजनक शारीरिक तपासणीला सामोरे गेलेल्या मुलींच्या मानसिकतेचा विचार करून सर्व मुलींचे बाल कल्याण समितीकडून समुपदेशन करण्यात यावे असे ही चाकणकर यांनी प्रशासनास सांगितले.

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला