रस्ते विकासासाठी निकडीनुसार मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करा - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे


गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य - मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मुंबई, दि. १८ : राज्यातील रस्त्यांची कामे करताना त्यांची निकड विचारत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) निश्चित करावी, अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तर गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.

अमरावती आणि नागपूर विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले, सचिव संजय दशपुते यांच्यासह विभागाचे अधिकारी तसेच अमरावती आणि नागपूर विभागाचे मुख्य अभियंता दूरदृश्य प्रणालीद्वारे यावेळी उपस्थित होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, रस्त्यांची कामे निवडताना त्यांची निकड आणि तातडी या बाबी विचारत घेण्याचे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने निकडीसाठीचे धोरण आणि एसओपी तयार करुन जोडल्या जाणाऱ्या गावांचे जीवनमान उंचावले जाईल असे रस्ते बनवण्यासाठी व्हिजन ठरवून काम करावे. यासाठी विभागाने आपल्या सुस्पष्ट अभिप्रायांसह योजनाबद्धरितीने अत्यावश्यक कामे प्रस्तावित करावीत, असे त्यांनी सांगितले.

आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य

मंत्री भोसले म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गावांना जोडण्याबरोबरच राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देणाऱ्या रस्त्यांना प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर पर्यटन वृद्धीसाठी आवश्यक असलेल्या तसेच व्यापार वृद्धीच्यादृष्टीने बंदरांशी जोडणाऱ्या रस्त्यांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे.

अमरावती विभागातील अचलपूर – बडनेरा – यवतमाळ या रस्त्यासाठी हायब्रीड अन्युयिटी मॉडेल (हॅम) अंतर्गत प्रस्ताव पाठवण्याची सूचना मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीच्या अधिकाऱ्यांना दिली.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन