नाशिक जिल्हा न्यायालय इमारतीसाठी ३१० कोटींचे सुधारित बजेट


नाशिक वकील संघाच्या पाठपुराव्याला यश : सप्टेंबरमध्ये होणार उद्घाटन

नाशिक :- नाशिकच्या वैभवात भर टाकणाऱ्या नाशिक जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी महाराष्ट्र शासन आणि उच्च न्यायालय, मुंबई यांच्या मंजुरीनंतर राज्य शासनाने ३१० कोटींच्या सुधारित प्रस्तावास प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासंदर्भात राज्याच्या विधी विभागाने गुरुवारी (दि.१९) शासन आदेश जारी केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिक वकील संघाकडून सुरु असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असल्याची प्रतिक्रिया वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. सुमारे ४ लाख चौ. फुटाचे बांधकाम असलेल्या नवीन पर्यावरणपूरक भव्य इमारतीचे बांधकाम पूर्णत्वाकडे आले आहे. येत्या तीन महिन्यांत इमारतीचे उद्घाटन होणार असल्याचा मनोदय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भुषण गवई यांनी जाहीर केला आहे.
पोलीस खात्याची जागा जिल्हा न्यायालयाला मिळावी, म्हणून नाशिक वकील संघाने अनेक वर्षे संघर्ष करून सदर जागा मिळविली. अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली व बार कौन्सिलचे सदस्य ॲड. जयंत जायभावे, ॲड.अविनाश भिडे यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी सतत पाठपुरावा करून हा भव्य प्रकल्प पुर्णत्त्वास नेला आहे.
४ वर्षांपूर्वी इमारत बांधकामासाठी १७१.७७ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर ४ लाख फूट भव्य व आधूनिक इमारतीचे काम सुरू झाले. आता शासनाने ३१० कोटींच्या खर्चास शासन आदेशानुसार सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. येत्या सप्टेंबर २०२५ मध्ये या इमारतीचे उद्घाटन करण्याचा मनोदय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती भुषण गवई यांनी मुंबई येथे जाहीर केला आहे.
इमारतीच्या या प्रकल्पासाठी नाशिक वकील संघाने सतत पाठपुरावा केला आहे. शासन आदेश काढल्याबद्दल नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य न्यायमूर्ती आराधे साो. व न्यायमूर्ती भूषण गवई यांचे मनःपूर्वक आभार मानले आहे. तसेच लवकरच उ‌द्घाटनाचा भव्य सोहळा होणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. प्रसिद्धीपत्रकावर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. नितीन ठाकरे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे सदस्य ॲड. जयंत जायभावे व ॲड. अविनाश भिडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सध्याच्या नाशिक न्यायालयाच्या ब्रिटीशकालीन हेरिटेज इमारतीच्या पाठीमागील बाजूला ही नवीन इमारत होणार आहे. त्यामुळे सहाजिकच न्यायालयाच्या भव्यदिव्यतेचे सौदर्य आणखी खुलणार आहे. मागच्या बाजूला अद्यावत पर्यावरणपूरक इमारत आणि पुढच्या बाजूला हेरिटेज वास्तू म्हणजे बांधकाम क्षेत्राला एक दिशा देणार आहे. महाराष्ट्रातील न्यायालयीन इमारतीत ही नाशिकची इमारत आधुनिक व आदर्श ठरणार आहे. 
- ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष, नाशिक बार असोसिएशन

Comments

Popular posts from this blog

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

राज्यातील ५६० गोशाळांच्या खात्यात २५ कोटी ४४ लाखांचे अनुदान जमा

मुख्यमंत्री योजनादूत’; अर्ज करण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करण्याची केंद्राकडे पणनमंत्री,कृषीमंत्री यांची मागणी

मोहदरी घाटात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या मृत्यूमुखी

त्र्यंबकेश्वर देवस्थानला सर्वात मोठे सव्वा किलो सोने दान

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काही सेकंदामुळे त्या युवकाचा जीव वाचला