राणेनगरमध्ये शिवसेनेतर्फे ‘गुरुधन पॅथॉलॉजिकल लॅब’चे उद्घाटन
नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी
नाशिक इंदिरानगर - शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत राणेनगर परिसरात ‘गुरुधन पॅथॉलॉजिकल लॅब’ या मोफत आरोग्य तपासणी केंद्राचा शुभारंभ उपमहानगर प्रमुख विनोद दळवी यांच्या पुढाकारातून करण्यात आला. सामाजिक जाणिवेतून साकारलेल्या या उपक्रमाचा लाभ प्रभागातील गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांना मिळणार असून, ही लॅब प्रगतीशील आरोग्यदृष्टीचा एक महत्त्वाचा टप्पा ठरत आहे.
या लॅबमध्ये सीबीसी, युरिक अॅसिड, कॅल्शियम, फास्टिंग शुगर यांसह विविध आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. वाढत्या महागाईच्या काळात ही सेवा म्हणजे सामान्य जनतेसाठी मोठा दिलासा ठरत असून, अनेक नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आरोग्यसेवेसोबतच समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी १९ जून रोजी परिसरातील दहावी व बारावी उत्तीर्ण २५० हून अधिक विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड, उपनेते सुनील बागुल, जिल्हाध्यक्ष डी. जी. सूर्यवंशी, माजी आमदार वसंत गीते यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. “सामान्य माणसाच्या गरजा लक्षात घेऊन उभारलेली ही मोफत लॅब म्हणजे फक्त आरोग्य तपासणी नाही, तर ही समाजासाठी एक सेवा आहे,” असे मत विनोद दळवी यांनी व्यक्त केले. अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
Comments
Post a Comment