अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग साधना मानवधन संस्थेचा कृतीकार्यक्रम
नाशिक :- योग साधना - मानवधन संस्थेचा अखंड कृतीकार्यक्रम संस्थेत आयुष मंत्रालयातर्फे विशेष कार्यक्रम आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने मोरारजी देसाई राष्ट्रीय संस्थान आयुष मंत्रालय भारत सरकारच्या सहयोगातून व इंटरनॅशनल नॅचरल थेरेपी ऑर्गनायझेशन सूर्या फाउंडेशन यांच्या आयोजनातून मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्था नाशिक संचलित शाळांमध्ये योग प्रात्यक्षिक कृतीकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाची योग थीम, 'एक पृथ्वी एक स्वास्थ्य के लिए योग' ही होती. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिवगोरक्ष योग पीठाचे शिवानंद महाराज, योगतज्ञ डॉ.तस्मिना शेख, योगतज्ञ डॉ. हेमचंद्र भुसे, भ्रमर वृत्तपत्राचे संपादक चंदुलाल शहा, संस्थेचे संस्थापक डॉ. प्रकाश सुकदेव कोल्हे व संस्था सचिव तथा शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती कोल्हे हे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून सरस्वती पूजन करण्यात आले.डॉ. भसे यांनी योग प्रात्यक्षिकाद्वारे विविध आसनांचे प्रकार विद्यार्थ्यांकरवी करवून घेतले.
'योग म्हणजे आपल्या शरीरातील पंच तत्वांना योग्य रीतीने चालविण्याची सुयोग्य क्रिया. योगाचे महत्त्व पुराण ग्रंथातही अपरंपार वर्णिले आहे. आरोग्याचा मूलमंत्र हा योग आहे. विश्वगुरू भारत निर्मितीसाठी योगाचे महात्म्य सर्वांनी अंगिकारावे.' अशा शब्दात शिवानंद महाराज, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. डॉ.तस्मिना शेख यांनी आरोग्य संवर्धनासाठी योगाचे महत्त्व विषद केले.डॉ. प्रकाश कोल्हे,यांनी योगाचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. विद्यार्थी तसेच शिक्षकवृंद सर्वांनी मिळून योगाचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा अहिरे, यांनी केले. यावेळी शिक्षक प्रतिनिधी, सर्व शिक्षकवृंद तसेच कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.
Comments
Post a Comment