मुंबई नाका व द्वारका सर्कलवरील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सिग्नल यंत्रणा तातडीने कार्यान्वित करा-मंत्री छगन भुजबळ
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून द्वारका सर्कलची पाहणी
मुंबई नाका व द्वारका सर्कल वरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी संयुक्त कार्यवाही करावी-मंत्री छगन भुजबळ
अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या दिरंगाई बाबत मंत्री छगन भुजबळ यांनी सुनावले खडेबोल
नाशिक,दि.१४ जून :- मुंबई नाका व द्वारका सर्कल वर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी तातडीने सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी. तसेच परिसरातील वाहतूक वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिस, महानगरपालिका आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संयुक्तपणे कार्यवाही करावी,अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील मुंबई नाका व द्वारका सर्कल परिसरास भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी ते उपस्थित अधिकाऱ्यांशी बोलत होते. यावेळी म्हाडाचे सभापती तथा शहराध्यक्ष रंजन ठाकरे, पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, महानगरपालिकेचे शहर अभियंता संजय अग्रवाल, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता दिलीप पाटील, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, समाधान जेजुरकर, नाना पवार यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, मुंबई येथील हाजी अली परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कार्यान्वित सिग्नल यंत्रणेच्या धर्तीवर या परिसरात यंत्रणा कार्यान्वित करावी. या सिग्नलवरील वाहतूक सरळ दिशेने राहील याची दक्षता घ्यावी. वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करताना त्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी. सिग्नल परिसरासह रस्ते स्वच्छ राहतील याचीही काळजी घ्यावी. रस्त्यावर वाहने थांबविणाऱ्याविरुद्ध कारवाई करावी,अशाही सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
त्याचबरोबर मुंबई नाका व द्वारका परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाला विक्रेत्यांनी अतिक्रम केले असून त्यांचे संसार देखील तिथेच थाटले आहे. गेल्या वर्षभरापासून ते हटविण्याबाबत नाशिक मनपा, पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत. मात्र वारंवार सांगून देखील छोटी छोटी कामे अधिकाऱ्याकडून होत नसल्याचे खडेबोल अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच मुंबई नाका व द्वारका परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या विक्रेत्यांना तातडीने हटविण्यात यावी. या परिसरातील व्यावसायिक व कुटुंबीयांचे स्थलांतर करण्यात यावे. फेरीवाल्यांमुळे या परिसरात प्रचंड अस्वच्छता पसरली आहे. या परिसराची नियमित स्वच्छता करण्यात येऊन परिसर स्वच्छ ठेवावा अशा सूचना सबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
Comments
Post a Comment