शिक्षकविरोधी शासन निर्णयांविरोधात नाशिकमध्ये जोरदार ‘धरणे आंदोलन'


नाशिक | १७ जून २०२५ :- राज्यातील शिक्षक शिक्षकेतर वर्गावर शासनाकडून सातत्याने अन्यायकारक निर्णय लागू होत असून, या निर्णयांविरोधात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ व नाशिक जिल्हा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने आज जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयासमोर एकत्र येत जोरदार ‘धरणे आंदोलन’ करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) यांच्या आदेशानुसार राज्यभर हे आंदोलन एकाच दिवशी घेण्यात आले.

शासन निर्णयांविरोधात संतप्त शिक्षकवर्ग रस्त्यावर! शासनाने गेल्या काही वर्षांपासून घेतलेले अनेक निर्णय खाजगी मान्यता प्राप्त अनुदानित माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवासुरक्षेला गंभीर धक्का देणारे ठरत आहेत. विशेषतः खालील परिपत्रकांविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

आंदोलनातील ठळक मुद्दे महत्वाचे
दिनांक २८ एप्रिल २०१५ चे संचमान्यता व अनुषंगिक विषयक परिपत्रक
दिनांक २ जुलै २०१६ चे खाजगी शाळांतील अनुदान धोरणबदल

दिनांक १५ मार्च २०२४ चे संचमान्यतेसंबंधी नवे निकष

आणि नुकतेच, ५ जून २०२५ रोजी इयत्ता सहावी ते आठवीसाठी कला, क्रीडा व कार्यानुभव विषयांसाठी मानधन तत्त्वावर कंत्राटी शिक्षकांची भरती करण्याचा आदेश

प्रमुख मागण्या

१. अनुदान बंदीविषयी परिपत्रक मागे घ्यावे
शासनाने १२ एप्रिल २०२४ रोजी काही विषयांना अनुदान नाकारणारे परिपत्रक काढले. त्यामुळे संबंधित विषय शिक्षकांची सेवा व वेतन धोक्यात आले आहे.

2. नियुक्त शिक्षकांच्या मान्यतेतील अडथळे दूर करावेत
शासनाच्या विविध अटी व प्रक्रियेमुळे अनेक शिक्षकांचे वेतन प्रस्ताव प्रलंबित असून, त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

3. रिक्त पदांवर तातडीने भरती करावी
शाळांमध्ये असंख्य पदे रिक्त असतानाही शासन मान्यता न दिल्यामुळे ती भरली जात नाहीत. त्यामुळे शिक्षकांना विनावेतन सेवा बजवावी लागत आहे.

4. प्रवेशोत्तर मान्यतेची अट रद्द करावी
२०१२ नंतर नियुक्त शिक्षकांना शिक्षणहक्क अधिनियमाअंतर्गत वेतन द्यावे. सध्याच्या अटी शैक्षणिक आणि कायदेशीर दृष्टिकोनातून अयोग्य आहेत.

5. मानधन तत्त्वावरील शिक्षक भरती रद्द करावी
कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांसाठी कायमस्वरूपी पदे असताना कंत्राटी व मानधन पद्धतीने शिक्षक भरती करणे ही शिक्षणव्यवस्थेची अवहेलना आहे.
शिक्षण क्षेत्र हे राष्ट्राच्या भविष्याशी निगडित असून शिक्षकांच्या मूलभूत गरजांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास परिणाम संपूर्ण समाजावर होतील, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

या आंदोलनात नाशिक जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ, नाशिक महानगर माध्यमिक शिक्षक संघ टि.डि.एफ.चे रविंद्र मोरे , माध्यमिक शिक्षक संघटनेचे सी. पी. कुशारे,बाळासाहेब देवरे, किशोर जाधव, निलेश ठाकूर,प्रदीपसिंह पाटील, भाऊसाहेब शिरसाट,रोहित गांगुर्डे ,संग्राम करंजकर,रामदास गडकरी,सचिन पगार,
सूर्यभान सादळे,पांडुरंग मुळाणे, विनायक मावळ शिक्षक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या आंदोलनादरम्यान शिक्षक संघटनेच्या वतीने तयार करण्यात आलेले निवेदन कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी शिवराम बोटे यांनी स्वीकारले. लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे संघटनांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन