बियाणे आणि खते शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करावे - मंत्री छगन भुजबळ
नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने शासनास पाठवावे - मंत्री छगन भुजबळ
नाशिक,येवला,दि.१५ जून:- शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीबाबत तातडीने पंचनामे करून शासनास सादर करावे. अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला येथील संपर्क कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत विविध विकासकामांबाबत तसेच पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्यावेळी ते अधिकाऱ्यांशी बोलत होते.
यावेळी प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड,निवासी नायब तहसीलदार पंकज नेवसे, येवला शहर पोलिस निरीक्षक धीरज महाजन, तालुका पोलिस निरीक्षक मंडलिक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य हुसेन शेख, जलचिंतन सेलचे जिल्हाध्यक्ष मोहन शेलार, उपाध्यक्ष दत्ता निकम, शहराध्यक्ष दीपक लोणारी, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, मलिक मेंबर, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, अविनाश कुक्कर, यांच्यासह महावितरण आदी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहर व तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या कांद्यासह अन्य पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेला कुठलाही शेतकरी मदतीपासून वंचित राहता कामा नये. यासाठी तातडीने पंचनामे पूर्ण करून प्रस्ताव तातडीने शासनास सादर करावे. वीजपडून तसेच अतिवृष्टीमुळे जीवित हानी व वित्त हानी झालेली असेल त्यांचे पंचनामे करून त्यांना मदत उपलब्ध करून देण्यात यावी अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ते म्हणाले की, तालुक्यात शासनाकडून २५० क्विंटल मोफत बियाणाचे उपलब्ध करून देण्यात आले आहे. या बियाणाचे लाभार्थ्यांना योग्य रित्या वाटप करण्यात यावे. शेतकऱ्यांना खतांचा पुरवठा मुबलक प्रमाणात होण्यासाठी आवश्यक तितका स्टॉक करून ठेवण्यात यावा तसेच त्यानुसार शासनाकडे मागणी करण्यात यावी. शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा मूलबक प्रमाणात पुरवठा होण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे अशा सूचना केल्या.
ते म्हणाले की, तालुक्यात काही भागात अद्यापही पाणी टंचाई असून याभागातील नागरिकांना नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा. या परिसरात १ जुलै नंतर देखील टँकरची आवश्यकता लागल्यास तातडीने प्रस्ताव पाठविण्यात यावा. येवला शहरातील साठवण तलावात पाणी उपलब्ध करून देण्यात आले असून शहरात नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या.
पुणेगाव - दरसवाडी - डोंगरगाव कालव्याच्या अस्तरीकरण कामाचा आढावा
पुणेगाव दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालव्याचे टप्पा १ व टप्पा २ अंतर्गत अस्तरीकरण करण्यात येत आहे. या कामाचा आढावा घेत मंत्री छगन भुजबळ यांनी अस्तरीकरणाचे हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. आवश्यक त्या ठिकाणी पोलिस सुरक्षा पोलिस विभागाने उपलब्ध करून द्यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी अस्तिरीकरणाचे राहिलेले टप्पा १ मधील काम ३० जून २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
येवला शहर व तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा
येवला शहर व तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. या तक्रारींची दखल घेऊन सुरक्षेबाबत पोलिसांनी पेट्रोलिंग करून बंदोबस्त ठेऊन नियोजन करावे. कायदा व सुव्यवस्था राखण्यात यावी. येवला शहरात निर्माण करण्यात आलेल्या पोलिस चौकिमध्ये स्वतंत्र पोलिसाची नेमणूक करण्यात यावी. येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलिस अधिकाऱ्यांना केल्या.
Comments
Post a Comment