लासलगावसह ४६ गाव परिसरात महावितरणची ४५ कोटींची कामे सुरू - मंत्री छगन भुजबळ
येवला विधानसभा मतदारसंघातील महावितरणच्या कामाचे अधिक बळकटीकरण - मंत्री छगन भुजबळ
शेतकरी व नागरीकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार - मंत्री छगन भुजबळ
अतिरिक्त रोहित्रांमुळे शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार - मंत्री छगन भुजबळ
महावितरणच्या ४५ कोटींच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकर्पण संपन्न
येवला,निफाड,दि.२२ जून :- शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्त्वाची गरज आहे. पाऊस सुरू झाल्यामुळे खरिप हंगामाची कामे सुरू झाली आहे. महावितरणच्या माध्यमातून आज कार्यान्वित झालेल्या रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
आज निफाड तालुक्यातील देवगाव, कानळद, मरळगोई, खडकमाळेगाव व विंचूर येथे महावितरणच्या विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकर्पण मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडी, महावितरणचे कार्यकारी अभियंता के.व्हि.काळुमाळी, उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय फुंडे, सुनील राऊत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर, लासलगाव बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर जगताप, संचालक डॉ.श्रीकांत आवारे, संचालक तानाजी आंधळे, भाऊसाहेब बोचरे, शिवाजी सुपनर, विनोद जोशी, सरपंच दत्तूपंत डुकरे, सरपंच बाळासाहेब पुंड सरपंच दत्तात्रय घोटेकर, सरपंच संदीप गारे, सरपंच सचिन दरेकर, सरपंच संजय घायाळ, दत्तात्रय रायते, गोरख शिंदे, सुरेखा नागरे, मंगेश गवळी, अरुण घुगे, तुकाराम गांगुर्डे, अशोक नागरे, पांडुरंग राऊत, विलास गोरे, बालेश जाधव, योगेश साबळे, बबन शिंदे, राहुल डुंबरे, अनिल सोनवणे, किशोर जेऊघाले, माधव जगताप, शिवाजी जाधव, प्रकाश घोटेकर, राहुल आहेर, भाऊसाहेब पारखे, मिलिंद पगारे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज ही अत्यावश्यक आहे. ही गरज ओळखून शासकीय योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे. येवला व लासलगावसह अतिरिक्त रोहित्र बसविणे व त्यांची क्षमता वाढविणे यासह अनुषंगिक कामे ४५ कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेत. त्यामुळे या भागातील विजेच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. अतिरिक्त लोड मुळे खराब होणारी रोहित्रांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी. शेतकरी व नागरिक विजेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेत मंजूर करण्यात आलेली विजेची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या.
ते म्हणाले की, सारोळे खू. येथे ६०० कोटी रुपयांच्या माध्यमातून ४०० केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक गावांचा विजेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरावे लागते. शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून त्यादृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहे. अधिक स्वस्त आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून सौर ऊर्जा व पवन ऊर्जेतून वीज निर्मिती करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहे. आगामी काळात नैसर्गिक स्तोत्रातूनही मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
महावितरणच्या आरडीएसएस लॉस रीडक्शन योजनेअंतर्गत एसीकेबल टाकण्यात येऊन कंडक्टर बदलणे, अपग्रेड करणे ही कामे करण्यात येत आहे. त्यानंतर रोहीत्रांवरील अनधिकृत भार कमी होऊन रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
निफाड तालुक्यातील खडक माळेगाव विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए व मरळगोई विद्युत उपकेंद्रात अतिरिक्त ५ एमव्हीए क्षमतेचे अतिरिक्त रोहित्र आज कार्यान्वित करण्यात आले आहे.लवकरच मतदारसंघातील संपूर्ण विद्युत केंद्रांचे बळकटीकरण होऊन ग्राहकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे कार्यकारी अभियंता काळुमाळी यांनी प्रास्ताविकात सांगितले.
मंत्री भुजबळ यांच्या हस्ते या कामांचे झाले भूमीपूजन व लोकार्पण
देवगाव येथे ५ एम.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्रामध्ये रोहित्राची क्षमता १० एम.व्ही.ए करणे या कामाचे भुमीपूजन. (र.रु.१७८.०४ लक्ष)
कानळद येथे ५ एम.व्ही.ए.चे विद्युत उपकेंद्रामध्ये रोहित्राची क्षमता १० एम.व्ही.ए करणे कामाचे भुमीपूजन. (र.रु. १४२.५७लक्ष)
मरळगोई येथे कृषी आकस्मितता निधीमधुन ५ एम.व्हि.ए. चा अतिरिक्तं रोहीत्र बसविणे उद्घाटन. (र.रु. १५०.५२ लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)
खडकमाळेगांव येथे कृषी आकस्मितता निधीमधुन ५ एम.व्हि.ए. चा अतिरिक्ता रोहीत्र बसविणे उद्घाटन. (र.रु. १३९.६९ लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)
विंचूर येथे कृषी आकस्मितता निधीमधुन ५ एम.व्हि.ए. चा अतिरिक्तष रोहीत्र बसविणे कामाचे भुमीपूजन. (र.रु. १२८.२७ लक्ष) (मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना)
Comments
Post a Comment