राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने केले सन्मानित


कोणत्याही शिक्षण व्यवस्थेच्या यशात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्वाची असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली :- राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (5 सप्टेंबर, 2024) शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात देशभरातील शिक्षकांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

कार्यक्रमाला संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, शिक्षकांनी असे नागरिक घडवायला हवेत, जे केवळ शिक्षित नसतील, तर संवेदनशील, प्रामाणिक आणि उपक्रमशीलही असतील. जीवनात पुढे जाणे हे यश आहे, पण इतरांच्या कल्याणासाठी काम करण्यामध्ये जीवनाचा अर्थ सामावला आहे, असे त्यांनी सांगितले.आपण संवेदनशील असायला हवे. आपले आचरण नैतिक असावे. सार्थक जीवनातच यशस्वी जीवन सामावले आहे. ही मूल्ये विद्यार्थ्यांना शिकवणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. राष्ट्रपती म्हणाल्या की, कोणत्याही शिक्षण व्यवस्थेच्या यशात शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची आहे.अध्यापन हे केवळ काम नसून, ते मानवी विकासाचे पवित्र मिशन आहे. मूल चांगली कामगिरी करू शकत नसेल,तर त्याची मोठी जबाबदारी शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांवर असते. शिक्षक अनेकदा परीक्षेत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडेच विशेष लक्ष पुरवतात,याकडे त्यांनी लक्ष वेधले. तथापि, उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी हा उत्कृष्टतेचा केवळ एक आयाम आहे. एखादे मूल उत्तम खेळाडू असू शकते, काही मुलांमध्ये नेतृत्व गुण असतील, आणखी एखादे मूल समाजकल्याणाच्या उपक्रमात उत्साहाने भाग घेईल. शिक्षकाने प्रत्येक मुलाची नैसर्गिक प्रतिभा ओळखून त्याला खतपाणी घालायला हवे.

राष्ट्रपती म्हणाल्या की, कोणत्याही समाजातील महिलांची प्रतिष्ठा हा त्या समाजाच्या विकासाचा महत्वाचा निकष असतो. त्या म्हणाल्या की, मुलांची वर्तणूक नेहमी महिलांच्या प्रतिष्ठेचा सन्मान करणारी असावी, अशा पद्धतीने शिक्षण देणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे.महिलांचा सन्मान केवळ 'शब्दांत' नव्हे, तर 'व्यवहारात' असायला हवा, यावर त्यांनी भर दिला.

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या मते, जर एखादा शिक्षक स्वत: सतत ज्ञान प्राप्त करत नसेल तर तो खऱ्या अर्थाने शिकवू शकत नाही. सर्व शिक्षक ज्ञानप्राप्तीची प्रक्रिया सुरूच ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असे केल्याने त्यांची शिकवण अधिक समर्पक आणि लक्ष वेधक राहील, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपतींनी शिक्षकांना सांगितले की, त्यांच्या विद्यार्थ्यांची पिढी विकसित भारताची निर्मिती करेल. शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे जागतिक मानसिकता आणि जागतिक दर्जाचे कौशल्य असायला हवे, असे त्या म्हणाल्या. त्या म्हणाल्या की, असामान्य शिक्षक महान राष्ट्राची निर्मिती करतात. केवळ विकसित मानसिकतेचे शिक्षकच विकसित राष्ट्र घडवणारे नागरिक घडवू शकतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन आपले शिक्षक भारताला जगाचे ‘नॉलेज हब’ (ज्ञान केंद्र) बनवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन