मविप्र तून तयार व्हावेत ऑलिम्पिक खेळाडू - ॲड नितीन ठाकरे
नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तसेच गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२३) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रमाप्रसंगी पदाधिकारी, मान्यवर व शिक्षकवृंद
मविप्रच्या मध्यवर्ती कार्यालयात ऑलिम्पिक डे साजरा
नाशिक : मविप्र संस्थेत शालेय शिक्षणाबरोबरच क्रिडाविषयक शिक्षण व उपक्रमांना प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आजवर संस्थेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविले आहे. संस्थेच्या शाळा-महाविद्यालयांमध्ये खेळाडूंसाठी पोषक वातावरण असून, भविष्यात संस्थेतून ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत व संस्थेचे व देशाचे नावलौकिक करावे, अशी अपेक्षा मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केली.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्था तसेच गंगापूर रोडवरील अभिनव बाल विकास मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.२३) संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात पार पडलेल्या जागतिक ऑलम्पिक दिन कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी मविप्रचे अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, शहर संचालक ॲड. लक्ष्मण लांडगे, चांदवडचे संचालक डॉ. सयाजीराव गायकवाड, मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, डॉ. दौलत जाधव, डॉ. मोरे, डॉ. कैलास शिंदे, अभिनव बाल विकास मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, मराठा हायस्कूलचे पर्यवेक्षक कोतवाल, रायते, सर्व क्रीडाशिक्षक, खेळाडू, अभिनवचे सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. आलेल्या सर्व मान्यवरांचे मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी यांनी स्वागत करून, पुस्तक, भेटवस्तू व गुलाबपुष्प देऊन आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार केला. ज्येष्ठ शिक्षिका रंजना पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ॲड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मंगला गुळे व मोनाली बोरगुडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. हेमंत पाटील यांनी आभार मानले.
खेळाडू व प्रशिक्षकांचा सत्कार
पॅरिस येथे होणाऱ्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेच्या टी-४७ या प्रवर्गातील ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात निवड होण्यासाठीचा आरक्षण कोटा पटकाविणारा आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक विजेता खेळाडू दिलीप गावित तसेच त्याचे प्रशिक्षक वैजनाथ काळे यांचा विशेष सत्कार मविप्रच्या वतीने सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केला.
मविप्रतर्फे घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन
दि.२३ जून हा ऑलिम्पिक दिवस म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात करणारे फ्रेंच तत्वज्ञ बॅरन पियर दि कुबर्टीन यांच्या योगदानाबद्दल त्यांची आठवण म्हणून जागतिक ऑलिंपिक दिवसाची सुरुवात झाली. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे दि.२३ ते २९ जून हा कालावधी ऑलिंपिक सप्ताह म्हणून साजरा करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने या सप्ताहात मविप्रतर्फे ऑलिंपिकविषयक तसेच क्रीडाविषयक घोषवाक्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment