क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा - उपमुख्यमंत्री अजित पवार

महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतुद केली जाणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
जुलै अखेरीस भिडेवाडा येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन- मंत्री छगन भुजबळ

पुणे, दि. १४: महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्या दृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया तातडीने राबवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.

विधानभवन पुणे येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला. तळ मजल्यावर महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था,वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री भुजबळ यांनी दिले.

जुलै अखेरीस या कामाचे भूमिपूजन करायचे असल्याने स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने गतीने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी छगन भुजबळ यांनी दिल्या.

*फुलेवाडा येथील महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्ताराचाही आढावा*
गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्मारकांच्या विस्तारासाठी आगामी अर्थसंकल्पात २०० कोटींची तरतुद करणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

महात्मा फुले यांच्या राज्य संरक्षित स्मारकाशेजारी दिडशे मीटर अंतरावर पुणे महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये महानगरपालिकेमार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचे काम करण्यात आलेले आहे. 
या दोन्ही स्मारकांना जोडण्यासाठी रस्ता करण्याचे नियोजित आहे. तेथे राहणाऱ्या रहिवाशांचे पुनर्वसन करून रस्ता करण्याचे प्रस्तावित आहे. त्याचप्रमाणे फुले वाड्याच्या आजूबाजूला राहत असलेल्या काही नागरिकांच्या जागा संपादित करून या स्मारकाच्या विस्तारासाठी प्रशस्त जागा उपलब्ध करण्याची मागणी आहे. या दोन्ही स्मारकांचे विकसन होण्यासाठी नगरविकास विभागाने हा निवासी झोन स्मारकासाठी आरक्षित केला असल्याचे छगन भुजबळांनी सांगितले.

भूसंपादन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि पुणे मनपाने या दोन्ही स्मारकांचा विस्तार करण्यासाठी आणि या वास्तूंसाठी जोड रस्ता विकसित करण्यासाठी भूसंपादनाची कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सुचना भुजबळ यांनी दिल्या.

या स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूमिसंपादन करण्याकामी लगतचे जागामालक आणि भाडेकरु यांना मोबदला देण्यासाठी रकमेच्या मागणीचा प्रस्ताव शासनाकडे तातडीने सादर करावा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राज्यातील रास्त भाव दुकानदारांना कमिशन वाढवून देण्यास सरकार सकारात्मक

देशातील प्रत्येक नागरिकाचा माननीय मोदीजींवर दृढ विश्वास - डॉ भारती पवार

सुखोई विमान अपघात शिरसगाव निफाड येथे मा.मंत्री खा भारती पवार यांची पाहणी