मी स्वतः मराठा हायस्कूलचाच विद्यार्थी : सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे
फोटो : नाशिक : गंगापूर रोडवरील मविप्र संचलित मराठा हायस्कूलमध्ये दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी उपस्थित मान्यवर व शिक्षकवृंद
मराठा हायस्कूलमधील गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप
नाशिक : मराठा हायस्कूलने माध्यमिक शालांत परीक्षेत असलेली गौरवशाली परंपरा यावर्षीही अबाधित ठेवली. मी स्वतः मराठा हायस्कूलचा विद्यार्थी असून, माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम येण्याचा मानदेखील मी प्राप्त केलेला आहे. शिस्त, गुणवत्ता व पारदर्शकता या त्रिसूत्रीनुसार विद्यालयाचे कामकाज खरंच कौतुकास्पद आहे. मेहनत घेतल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही आणि निश्चितच समोर बसलेले हे विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत राहतील, असा आशावाद मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी व्यक्त केला व सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या गंगापूर रोडवरील मराठा हायस्कूलमध्ये दहावीच्या परीक्षेत ९० टक्के व त्यापुढील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर मविप्र समाज नाशिक शहर संचालक ॲड.लक्ष्मण लांडगे, माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, मराठा हायस्कूलच्या मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे,
उपमुख्याध्यापक रंगनाथ उगले, पर्यवेक्षक राजेंद्र शेळके, शंकर कोतवाल व रामनाथ रायते उपस्थित होते.
विद्यालयातर्फे उपस्थित मान्यवरांना गुलाबपुष्प व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका कल्पना वारुंगसे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर प्रतिनिधिक स्वरूपात विद्यालयात प्रथम आलेली अन्वेषा नागपुरे हिने मनोगत व्यक्त केले. शाळेची शिस्त, शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच हे यश मी प्राप्त करू शकले, असे ती म्हणाली. यावेळी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या तब्बल १४० विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. ज्येष्ठ शिक्षक सुनील कदम यांनी सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक शंकर कोतवाल यांनी आभार मानले. सांस्कृतिक समिती प्रमुख चैताली गीते व सर्व सदस्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षकांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी उत्तम फलक लेखन कलाशिक्षक जगदीश डिंगे व केशव खताळे यांनी केले.
विद्यार्थी चालविताहेत शाळेचा गौरवशाली वारसा मुख्याध्यापक कल्पना वारुंगसे
शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन,विद्यार्थ्यांची कठोर मेहनत व पालकांचे उत्तम सहकार्य याचा उत्कृष्ट संगम म्हणजे मार्च २०२४ चा माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल होय. मराठा हायस्कूलचा विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात उत्तम कामगिरी करत आहे, ते केवळ या विद्यालयातून त्यांना दिलेले उच्चतम शिक्षण, जीवनमूल्य आणि पालकांकडून मिळालेले उत्तम संस्कार होय. यामुळेच मराठा हायस्कूलचा गौरवशाली वारसा विद्यार्थ्यांनी पुढे चालविलेला आहे. वर्षभर विद्यालयात विविध उपक्रम घेतले जातात व प्रत्येक उपक्रमात विद्यार्थी सक्रिय सहभाग नोंदवतात आणि उल्लेखनीय कामगिरीदेखील करतात, असे मुख्याध्यापक कल्पना वारुंगसे यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment