ॲड.संदीप गोपाळराव गुळवे यांना 'मविप्र'चा पाठिंबा - सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे
नाशिक : कुठलीही निवडणूक म्हटल्यावर त्यासाठी उमेदवार सक्षम असावा लागतो. त्याच्याकडे पुरेशी यंत्रणाही आवश्यक असते. या सर्व बाबी आमच्या संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्याकडे आहेत. त्यांचे वडील दिवंगत गोपाळराव गुळवे यांचा समर्थ वारसा त्यांना लाभलेला आहे. वडिलांप्रमाणेच जिल्हा बँक, जिल्हा परिषदेसह शिक्षणसंस्थेत त्यांनी यशस्वी भूमिका निभावली आहे. त्यामुळेच होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.मविप्र संस्थेचाही त्यांना पाठिंबा असल्याचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी संस्थेच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.
यावेळी ॲड. ठाकरे म्हणाले, 'मराठा विद्या प्रसारक समाज' ही १९१४ मध्ये स्थापन झालेली महाराष्ट्र राज्यातील ११० वर्षे जुनी नावलौकिकप्राप्त शिक्षणसंस्था आहे. संस्थेची स्थापना नाशिकच्या स्वातंत्र्यपूर्व इतिहासातील महत्वपूर्ण टप्पा होता. स्थापनेपासून अनेक दानशूर, शिक्षणप्रेमी, सेवाभावी, सामाजिक धुरिणांचा संस्थेच्या विकासात सक्रिय सहभाग राहिलेला आहे. समाजाचा सर्वांगीण विकास व्हावा व विविध शासकीय सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक लाभ समाजातील तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम राजकीय प्रतिनिधित्व असावे, यासाठी संस्था आग्रही असते. त्याचाच परिपाक म्हणून गेल्या ११० वर्षांत मविप्र संचालक मंडळातील अनेक सदस्यांनी केंद्र व राज्यस्तरावर लोकप्रतिनिधित्व करीत संस्थेची ध्येय-धोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविली आहेत. नाशिकच्या राजकीय परिक्षेत्रात संस्थेच्या निर्णायक पाठिंब्यामुळे अनेक उमेदवारांना यश मिळून केंद्र व राज्यस्तरावर लोकप्रतिनिधीत्वाची संधी मिळालेली आहे. यंदादेखील नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी होऊ घातलेल्या सन २०२४ च्या निवडणुकीमध्ये संस्थेने एकमताने संस्थेचे इगतपुरी तालुका संचालक तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गोपाळराव गुळवे यांना पाठींबा देण्याचा ठराव केलेला आहे. येणाऱ्या काळात संदीप गुळवे विजयी होऊन संस्था आणि पर्यायाने नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाचे यशस्वी व सक्षम नेतृत्व विधानपरिषदेत करतील, असा विश्वास ॲड. ठाकरे यांनी व्यक्त केला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधून निवडून आलेले राजाभाऊ वाजे आणि धुळे लोकसभा मतदार संघातून निवडून आलेल्या डॉ. शोभा बच्छाव हे दोन्ही उमेदवार मविप्रचे सभासद आहेत, हा आपल्यासाठी शुभशकून आहे. त्यांच्याप्रमाणेच ॲड. संदीप गुळवे यांनाही आलेल्या संधीचे सोने करता यावे, यासाठी मविप्रसह रयत शिक्षणसंस्था, टीडीएफ आदी संस्था आणि पाच जिल्ह्यांतील विविध शिक्षक संघटनांचे तसेच शिक्षणसंस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत, हेदेखील ॲड. ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. ॲड. गुळवे यांना शिक्षक भरती, शिपाईपद मान्यता, रिक्त जागा अशा शिक्षकांच्या अनेक प्रश्नांची जाण आहे. शिवाय आता वातावरण बदलले असून, जनतेला पर्याय हवा आहे. त्यामुळे शैक्षणिक कामांचा दांडगा अनुभव असलेल्या ॲड. संदीप गुळवे यांच्यासारखा सक्षम उमेदवार जनतेला अर्थात, शिक्षक मतदारांना मिळालेला आहे, असेही ठाकरे म्हणाले.
पत्रकार परिषदेस मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, उपाध्यक्ष विश्वास मोरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, ॲड. संदीप गुळवे, देवळ्याचे संचालक विजय पगार, नांदगावचे संचालक अमित बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रतिक्रिया
शैक्षणिक प्रश्न सोडविण्यासाठी रिंगणात : ॲड. संदीप गुळवे
नव्या शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाचे खासगीकरण होत आहे. त्यामुळे या नवीन धोरणाला आमचा कायम विरोध राहिला आहे. पाच जिल्हे आणि ५६ तालुक्यांमधील अनेक शैक्षणिक संघटना आणि शिक्षक मतदार माझ्या पाठीशी आहेत. शिक्षक, सेवक या घटकाला न्याय देण्यासाठी, त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी मी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे महाविकास आघाडीने अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली आहे, असेही यावेळी ॲड. संदीप गुळवे यांनी सांगितले.
७ तारखेला उमेदवारी अर्ज भरणार
येत्या शुक्रवार दिनांक ७ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजता सिन्नर येथील निसर्ग लॉन्स येथे विविध संघटनांचे सर्व पदाधिकारी, मान्यवर कार्यकर्ते गुळवे यांच्या पाठिंब्यासाठी एकत्र येणार आहेत. तेथून नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत मिरवणूक काढली जाणार असून, तेथे उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.
Comments
Post a Comment