एनआयएफटी मुंबई पदवीदान समारंभ 2024 मध्ये भविष्यातील फॅशन अग्रणींच्या क्षमता आणि सर्जनशीलतेचे दर्शन




मुंबई, 02 जून, 2024 :- एनआयएफटी मुंबईने  एनआयएफटी खारघर परिसरात आपल्या पदवी प्राप्त करणाऱ्या  वर्गाचे कार्यप्रदर्शन आयोजित केले होते. फॅशन आणि लाईफस्टाईल उद्योगातील आपल्या प्रतिष्ठित माजी विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या  एनआयएफटी मुंबईने 2024 मध्ये 307 विद्यार्थ्यांसाठी पदवीदान समारंभ आयोजित केला. पदवीदान सोहळा 2024 चे उदघाटन एनआयएफटी मुंबईचे संचालक प्रा. डॉ. पवन गोदियावाला आणि एनआयएफटीच्या माजी अधिष्ठाता डॉ. शर्मिला दुआ यांच्या उपस्थितीत झाले. डिझाईन आणि फॅशन उद्योगातील प्रमुख व्यक्तींच्या उपस्थितीने हा कार्यक्रम रंगला.

पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रॅज्युएशन शो, त्यांचा डिझाईन संग्रह सादर करण्यासाठी उत्तम मंच ठरला. या संग्रहांमध्ये कौटुंबिक काठांपासून वास्तुकला आणि दैवी घटकांपर्यंत कल्पनाविश्वाचे, विविध संकल्पनांचे दर्शन घडले. प्रत्येक संग्रहातून विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण सर्जनशीलता आणि दृष्टिकोन दिसून आला. पदवी प्राप्त करणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनी श्राव्या हिला नवोन्मेषी वस्त्र निर्मितीसाठी   मेहर कॅस्टेलिनो पुरस्कार मिळाला. ' घोस्टस ऑफ टाइम' हे तिच्या संग्रहाचे नाव असून तो नवा कल स्थापित करणारा आहे. प्रीती राऊत हिने  कॅलट्रावाच्या वास्तुशिल्प रचनांनी प्रेरित असलेल्या तिच्या डिझाईन कलेक्शनसाठी सर्वोत्कृष्ट वस्त्र निर्मितीसाठी  उषा इंटरनॅशनल अवार्ड,हा  पुरस्कार पटकावला. ऋषिकेश महाजन याला  कर्तृत्व, शिष्यवृत्ती आणि व्यक्तिमत्व यासाठी प्रतिष्ठित पर्सिस खंबाट्टा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फॅशन कम्युनिकेशन विभागातील अक्षत अमन याला  सर्वोत्कृष्ट पोस्टरचा पुरस्कार मिळाला.

एनआयएफटी मुंबईचे संचालक प्रा.डॉ.पवन गोदियावाला यांनी एनआयएफटीमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सर्वांगीण  शिक्षणाविषयी सांगितले. संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान, उद्योग अभिमुखता, सांघिक भावना  आणि व्यावसायिकतेने कसे सुसज्ज करते, त्यांना फॅशन उद्योगातील विविध भूमिकांमध्ये ते सहजपणे सामावले जावेत, यासाठी कसे तयार करते यावर त्यांनी भर दिला.  प्रा. गोदियावाला यांनी संस्थेच्या विकसित होत असलेल्या अध्यापनशास्त्राचा  उल्लेख केला. यात  केवळ डिझाईन, व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानच नव्हे तर आर्थिक सेवा, डिजिटल चलन, मेटाव्हर्स आणि डिजिटल शिक्षण यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांचाही समावेश आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनाचा उद्देश पदवीधरांना केवळ कर्मचारी म्हणून नव्हे तर भविष्यातील संभाव्य व्यवसाय मालक आणि नवोन्मेषक म्हणून सक्षम बनवण्याचा आहे.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालया अंतर्गत 1986 मध्ये स्थापित, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी (एनआयएफटी) ही  फॅशन क्षेत्रात शिक्षण देणारी देशातील एक अग्रणी संस्था आहे. एनआयएफटी  मुंबई, भारतातील सर्वात प्रतिष्ठित डिझाईन संस्थांपैकी एक असून संस्था  तिच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उच्च विद्याविभूषित  शिक्षक आणि उत्तम  उद्योग संबंधांसाठी  ओळखली जाते. ग्रॅज्युएशन शो 2024 हा 2024 च्या पदवी प्राप्त करणाऱ्या  वर्गासाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला. यातून त्यांचा  शैक्षणिक प्रवास आणि भविष्यातील  फॅशनवर  प्रभाव टाकण्याची  क्षमता दिसून आली. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, मित्र आणि फॅशन क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती उपस्थित होत्या.





      Comments

      Popular posts from this blog

      मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

      टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

      माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन