नाशिक येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन
(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- येथील ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या वतीने संस्थेच्या पूर्व प्रशासिका राजयोगिनी दादी प्रकाशमणीजी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त २२ ते २५ ऑगस्ट दरम्यान जगभरात विविध सेवा केंद्रांमधून महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान एक लाख युनिट रक्त संकलनाचा निर्धार संस्थेच्या सदस्यांनी केला आहे. आज, २३ ऑगस्ट रोजी येथील म्हसरूळ सेवा केंद्रातर्फे संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांच्या अध्यक्षतेखाली रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सिव्हिल सर्जन डॉ. चारुदत्त शिंदे, रेडिओलॉजिस्ट डॉ.राजेश जावळे,सामाजिक कार्यकर्ते आणि स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते,आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भाषणात डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले की, "रक्तदानामुळे फक्त एकच जीव वाचत नाही, तर त्यातील कंपोनंट वेगवेगळे करून जवळपास चार व्यक्तींना जीवनदान मिळू शकते. त्यामुळे प्रत्येकाने रक्तदान केलेच पाहिजे.सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात आणि त्यांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासत असते. अशा परिस्थितीत ब्रह्माकुमारी संस्थेने सिव्हिल हॉस्पिटलला रक्त संकलनाची संधी दिल्याबद्दल डॉ.शिंदे यांनी संस्थेचे आभार मानले. डॉ. शिंदे यांनी दरवर्षी रक्तदान करण्याचा संकल्प केला आहे. आजच्या रक्तदान शिबिरात सुद्धा डॉ.शिंदे यांनी स्वतः रक्तदान करून अनेकांसमोर आदर्श निर्माण केला. अध्यक्षीय भाषणात संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका ब्रह्माकुमारी वासंती दीदी यांनी सांगितले की, "संस्थेच्या पूर्वप्रशासिका ब्रह्माकुमारी दादी प्रकाशमणीजी यांचे समग्र जीवन विश्वाला बंधुत्वाचा संदेश देणारे ठरले आहे.त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आयोजित या रक्तदान शिबिरातून जास्तीत जास्त रक्त संकलन करून अशा पवित्र राजयोगी ब्रह्माकुमारी सदस्यांचे रक्त हे समाजासाठी अतिशय उपयुक्त ठरेल. ब्रह्माकुमारी सदस्यांच्या सकारात्मक चिंतनातून दिलेले हे रक्त समाजकार्यासाठी अनमोल ठरेल. प्रत्येकाने रक्तदान करायला हवे. यातून समाजसेवेचा चांगला पायंडा पडू शकतो," असेही दीदींनी याप्रसंगी नमूद केले.ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य नितीन भाई यांनी जवळपास ४४ वेळा रक्तदान करून समाजासमोर आदर्श ठेवल्यामुळे मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.डॉ.राजेश जावळे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, "रक्तदान हे महान कार्य असून ब्रह्माकुमारी सदस्यांचे पवित्र रक्त हे समाजाच्या कार्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते."कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन व फलकाचे अनावरण करून करण्यात आले.सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांनी केले. ब्रह्माकुमारी पूनम दीदी, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी आदी समर्पित भगिनी याप्रसंगी उपस्थित होत्या.रक्तदान शिबिरासाठी महिलावर्गाने खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दाखवला. याप्रसंगी हॉस्पिटलतर्फे रक्त संकलनासाठी दहा बेडची सुविधा देण्यात आली होती, मात्र त्याहून अधिक मोठ्या प्रमाणात रक्त देण्यासाठी गर्दी उसळली होती.संस्थेच्या सदस्यांचा हा उत्साह बघून डॉ.शिंदे यांनीसुद्धा याप्रसंगी रक्तदान केले.रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. अनेक रक्तदात्यांनी प्रथमच रक्तदान केल्यामुळे आनंद व्यक्त केला, तर अनेकांनी ब्रह्माकुमारी प्रकाशमणी दादी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रक्तदान करून समाधान व्यक्त केले.
Comments
Post a Comment