राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा व रुग्णवाहिका सेवांचा सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांकडून आढावा
मुंबई, दि. ७ : आरोग्य भवन येथे राज्यातील आरोग्य प्रयोगशाळा, १०२ रुग्णवाहिका सेवा व आरोग्य विभागाच्या परिवहन सेवेचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी घेतला. बैठकीत जलजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील आरोग्य संस्थांच्या परिसरातील जलस्रोतांचे पाणी शुद्ध व सुरक्षित असल्याची खात्री करण्यासाठी ग्रामपंचायतींना ‘रेड कार्ड’ व ‘ग्रीन कार्ड’ देऊन जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच सर्व जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा आयपीएचएस (IPHS)मानकांनुसार सुसज्ज असाव्यात, आधुनिक उपकरणे व प्रशिक्षित कर्मचारी असावेत आणि परिसर स्वच्छ असावा, यावर भर देण्यात आला. मंत्री आबिटकर यांनी खासगी रुग्णालयातील रुग्णांनी देखील सरकारी प्रयोगशाळेत तपासण्या कराव्यात, यासाठी प्रयोगशाळांचा दर्जा उंचावण्याचे निर्देश दिले. यामुळे शासनाला अतिरिक्त निधी मिळेल, असेही त्यांनी सांगितले. १०२ टोल फ्री रुग्णवाहिका सेवेसंदर्भात मंत्री बाबिटकर यांनी सूचना देताना सांगितले की, जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांतर्गत वापरात असलेल्या रुग्णवाहिका केवळ महिला व बालकांसाठी न वापरता, आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत इतर रुग्णांसाठीही वापरल्या जाव्यात. १०२ कॉल सेंटरचे योग्य प्रकारे मॉनिटरिंग करण्याचेही आदेश देण्यात आले.यावेळी राज्यातील आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदांच्या भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. सर्व सूचना त्वरित अंमलात आणून आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम व लोकाभिमुख करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. बैठकीस आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त संचालक डॉ. सुनिता गोल्हाईत तसेच आरोग्य विभागातील अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment