मनुष्याचे जीवन उज्वल बनवण्यासाठी द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळ्याचे आयोजन - ब्रह्माकुमारी वासंतीदीदीजी
लाखो भक्त करतील एका भव्य मंडपात एकाच ठिकाणी जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांचे प्रतिरूप दर्शन
त्र्यंबकेश्वर दिनांक १० :- भक्तांच्या भक्तीला आधार देण्यासाठी, मनुष्याचे जीवन उज्ज्वल बनवण्यासाठी, संपूर्ण भारतातील द्वादश ज्योतिर्लिंगांचे एकत्रितरीत्या, एका छताखाली दर्शन घेण्याचे भाग्य लाभावे, यादृष्टीने हा द्वादश ज्योतिर्लिंग प्रतिरूप अध्यात्मिक मेळा आयोजित करण्यात आलेला आहे.आजच्या कार्यक्रमाला आपल्यासारखे वेगवेगळ्या क्षेत्रातून आलेले पाहुणे लाभले, आपल्या विचारांतून नक्कीच भगवंताचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत होईल व आपल्या द्वारेही समाज उत्थानाचे हे श्रेष्ठ कार्य घडेल, असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी संस्थेच्या उपक्षेत्रीय मुख्य संचालिका, राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंती दीदीजी यांनी केले.श्रावण महिन्यात भगवंताच्या दर्शनाचे महत्त्व सांगितले जाते, त्यातही श्रावणी सोमवारी यात विशेष पुण्य प्राप्त होते; म्हणून मोठ्या प्रमाणात भक्तगण त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये येतात. याचेच औचित्य साधून ब्रह्माकुमारी संस्थेच्या नाशिक उपक्षेत्रीय सेवा केंद्रातर्फे, प्रसिद्ध अशा त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरात, बँक ऑफ महाराष्ट्र समोर, दिनांक १० ते १८ ऑगस्टपर्यंत एका भव्य मंडपात जगप्रसिद्ध बारा ज्योतिर्लिंगांच्या आध्यात्मिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन दीप प्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी त्र्यंबकेश्वर पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले,आनंद आखाडाचे प्रमुख शंकरानंद स्वामी, त्र्यंबकेश्वर देवस्थान विश्वस्त रूपालीताई भुतडा, विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, माजी विश्वस्त संतोष कदम, माजी विश्वस्त कैलास चोथे, माजी नगरसेवक दोबाडे विष्णू,पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनपा अधिकारी दिलीप काठे, सिव्हिल हॉस्पिटल सर्जन सुशील शिंदे, ब्रह्माकुमारी शक्ती दीदी, ब्रह्माकुमारी गोदावरी दीदी, ब्रह्माकुमारी विना दीदी,आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.पोलीस उपअधीक्षक वासुदेव देसले,यांनी आपल्या अनुभवयुक्त मनोगतात सांगितले की, चांगले माणूस घडवण्याचे कार्य ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे होत आहे. जगाने आदर्श घ्यावा असे यांचे कार्य आहे. ब्रह्माकुमारी संस्थेच्या प्रत्येक व्यक्तीकडे मी अतिशय आदराने बघतो. त्यांच्यामध्ये शालीनता, सहनशीलता व त्यांनी परिधान केलेल्या सफेद वस्त्रांकडे बघून समाधान वाटते. त्यांनी त्यांचे जीवन समाजाच्या हितासाठी समर्पित केलेले आहे. शवपेटीका हाताळताना आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले आहे की, मनुष्य जीवन हे क्षणभंगुर असून, यातून आत्मा निघून गेल्यानंतर खाली काहीच उरत नाही, असेही देसले यांनी स्पष्ट केले.आनंद आखाड्याचे प्रमुख शंकरानंद स्वामी,यांनी सांगितले की,सनातन धर्म चे कार्य करण्याचा व हिंदू धर्म मजबूत करण्याचा आमचा उद्देश असतो. यात ब्रह्माकुमारी संस्था सोबत हातात हात घालून देशाची व समाजाची सेवा आम्ही करू. आपल्या कार्यात आमच्या साधू समाजाचे सुद्धा आपल्याला निश्चित सहकार्य असेल, असेही स्वामीजींनी स्पष्ट केले.पुरोहित संघाचे प्रशांत गायधनी यांनी सांगितले की, महाराष्ट्रात बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाच प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहेत. त्यातल्या त्यात, आपल्या नाशिक नगरीतील त्र्यंबकेश्वर देवस्थानावर,उत्पत्ती,पालन,आणि विनाशाचे प्रतीक असलेले त्रिमूर्ती देवतांचा वास आहे. त्र्यंबकेश्वर येथील तिसऱ्या सोमवारच्या प्रदक्षिणेचे महत्त्व लक्षात ठेवून, हा अध्यात्मिक मेळा येथे आयोजित करण्यात आला आहे. ब्रह्म स्वरूप ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करताना शेकडो तीर्थ व निसर्गरूपी परमेश्वराला परिक्रमा करण्याचे पुण्य प्राप्त करतानाच, द्वादश ज्योतिर्लिंगांचे सुद्धा दर्शन येथे घडणार असल्याचे गायधनी यांनी याप्रसंगी नमूद केले. ब्रह्माकुमारी संस्थेच्या राजयोग ध्यान साधनेचा उत्कृष्ट नमुना म्हणून येथील साधक विष्णू दोबाडे यांचा दाखला याप्रसंगी गायधनी यांनी प्रस्तुत केला. राजकीय पक्षाचा एक आक्रमक नेता असूनही, विष्णू यांनी ब्रह्माकुमारींचा राजयोग ध्यान करून अगदी सहजरित्या समस्या कशा सोडवता येतील, याचे चांगले उदाहरण स्पष्ट केले आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थानचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले की, ब्रह्माकुमारी संस्थेचा पेगलवाडी स्थित शिवदर्शन सरोवर हा मोठा प्रकल्प त्र्यंबकेश्वर येथे होत आहे, हे आम्हा त्र्यंबकेश्वरवासीयांचे मोठे भाग्य आहे. मागच्या काळात आमच्याकडून असे मोठे कार्य होऊ शकले नाही, ते कार्य ब्रह्माकुमारी संस्था करीत आहे. ब्रह्माकुमारी संस्थेचे सदस्य अतिशय समर्पित भावनेने आपले कार्य करीत असतात. यांच्याशी बोलताना सुद्धा खूप चांगला आनंद प्राप्त होत असतो,असे भाव कडलक यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी पूनम दीदी यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी, डॉ.राजेश जावळे यांनी राजयोगा मेडिटेशन करून उपस्थितांना अंतर जगाची सफर घडवून दिली. ब्रह्माकुमार ओंकार यांनी भारत गौरव गीत गाऊन उपस्थितांची दाद मिळविली. ब्रह्माकुमारी ज्योती दीदी व मंगल दीदी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रास्ताविकात ब्रह्माकुमार दिलीप यांनी सांगितले की, श्रावण महिन्यात पाप क्षालन करण्यासाठी महादेवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एका ज्योतिर्लिंगावर जरी गेलात तरी पुण्य प्राप्त होते.मात्र येथे ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे बाराच्या बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंग प्रति रुप एका छताखाली दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यातून नक्कीच भक्तांना लाभ होईल.सदर द्वादश ज्योतिर्लिंग अध्यात्मिक मेळा १८ ऑगस्टपर्यंत उपलब्ध असून, सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांनी केले आहे. द्वादश ज्योतिर्लिंगांसोबतच येथे आध्यात्मिक पथप्रदर्शनी, आत्मअनुभूती कक्ष तयार करण्यात आला आहे. येथील भव्य शिवलिंग हे भक्तांच्या सेल्फी,फोटोसाठी प्रसिद्ध झाले आहे. या द्वादश आध्यात्मिक मेळ्यात दररोज हजारो भक्तगण दर्शनाचा लाभ घेतील, असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे. येथे आलेले भक्तगण स्वतःचा व परमात्म्याचा परिचय प्राप्त करून अधिक माहितीसाठी राजयोग कोर्स साठी नावे नोंदणी करीत आहेत. या पूर्ण समारंभाचे आयोजन, व्यवस्थापन नाशिक येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या साधकांनी अहोरात्र मोठ्या परिश्रमाने केले.
Comments
Post a Comment