वृद्धेच्या कानातील गाठ काढण्यात मविप्र रुग्णालयातील डॉक्टरांना यश,गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली यशस्वी
नाशिक :- वर्षभरापासून उजव्या कानातील वेदनांनी त्रस्त असलेल्या ७९ वर्षीय वृद्धेवर आडगांव येथील मविप्र संचलित डॉ. वसंतराव पवार रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून तिच्या कानाच्या वेदना शमविण्याचे काम केले आहे.मविप्र रुग्णालयाच्या कान-नाक-घसा तज्ज्ञ विभागात ही अत्यंत अवघड आणि गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे,यांनी दिली. इंदिरानगर येथील रहिवासी असलेल्या प्रभाकर ठाकरे यांच्या मातोश्री सुमन ठाकरे,या गेल्या वर्षभरापासून उजव्या कानातील प्रचंड वेदनांनी त्रस्त होत्या.सतत कान बंद जाणवणे, श्रवणशक्ती कमी होणे आणि कानात वेदना होणे हा त्रास त्यांना जाणवत होता.विविध स्थानिक रुग्णालयांत उपचार करूनही आराम न मिळाल्याने त्यांना आडगाव येथील मविप्र रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला होता.मविप्र रुग्णालयात यशस्वी उपचार होतील व वेदना दूर होतील, असा आत्मविश्वास देण्यात आल्याने सुमन ठाकरे यांना मविप्र रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागात दाखल करण्यात आले.डॉक्टरांना तपासणीअंती रुग्णाच्या उजव्या बाह्य श्रवण नलिकेत गाठ असल्याचे निदर्शनास आले.त्यानंतर सीटी स्कॅन व बायोप्सी करून निदान करण्यात आले. ही गाठ ‘वेल डिफरेंशिएटेड स्क्वॅमस सेल कार्सिनोमा’ असल्याचे चाचणीत निष्पन्न झाले.अखेरीस उच्चस्तरीय उपचार व यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे ही कर्करोगग्रस्त गाठ काढण्यात डॉक्टरांच्या पथकाला यश आले. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. महेश निकम, डॉ. श्रिया कुलकर्णी, डॉ. दिव्या बंगेरा व पथकाने यशस्वीपणे पार पाडली. या उपचारासाठी अत्यल्प खर्च झाला असून, खासगी रुग्णालयांमधील भरमसाठ खर्चाच्या तुलनेत रुग्णालयाने सामाजिक बांधिलकी जपत उपचार दिले. सुमन ठाकरे,यांच्या कुटुंबीयांनी कान-नाक-घसा विभागाच्या सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. आहेत. मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, सर्व पदाधिकारी संचालक आणि शिक्षणाधिकारी डॉ. ज्ञानेश्वर लोखंडे, अधिष्ठाता डॉ. सुधीर भामरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वसंत कवडे आणि भूलशास्त्र विभागाचे यासाठी मोलाचे सहकार्य लाभले आहे.
Comments
Post a Comment