मविप्र जनता विद्यालय पवननगर मध्ये सखीसावित्री, अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने समुपदेशन व मार्गदर्शन संपन्न
नाशिक :- मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय पवननगर येथे सखी सावित्री व अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थिनी तसेच माता पालकांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध समुपदेशिका डॉ. शितल गायकवाड या होत्या. तसेच माजी नगरसेविका प्रतिभाताई पवार, डॉ. सुलक्षणा बैरागी, शुभांगी गलांडे, कविता अहिरे, नाशिक सिव्हिल हॉस्पिटल आयसीटी विभाग प्रमुख योगिता चौधरी, ॲड. विद्या चव्हाण, नाशिक जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी उदय देवरे आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्याध्यापक अण्णासाहेब ठाकरे यांनी प्रास्ताविकात सखी सावित्री व अंतर्गत तक्रार समितीच्या समुपदेशन व मार्गदर्शन कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. प्रमुख पाहुण्या प्रतिभाताई पवार यांनी आपल्या मनोगतात सर्व माता पालकांना आपल्या विद्यार्थिनी पाल्यांच्या बाबतीत जागरूक राहण्यास सांगितले. डॉ. सुलक्षणा बैरागी यांनी विद्यार्थिनी व माता यांना आरोग्य व योगशिक्षण याविषयी माहिती दिली. आयसीटी सिविल हॉस्पिटल महाराष्ट्र राज्य एच.आय. व्ही. व एड्स नियंत्रण विभागाच्या प्रमुख योगिता चौधरी यांनी विद्यार्थिनींना तसेच माता पालकांना एच. आय. व्ही. एड्स व तत्सम आजारांविषयी माहिती सांगितली. ॲड. विद्या चव्हाण यांनी बालकांचे लैंगिक शोषण या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करून फक्त विद्यार्थिनी नव्हे तर विद्यार्थ्यांना सुद्धा समुपदेशनाची गरज असल्याचे सुचवले. कार्यक्रमाच्याअध्यक्षा डॉ. शितल गायकवाड यांनी मोबाईलच्या विळख्यात सापडलेले पालक व विद्यार्थी तसेच विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम व त्यामुळे पाल्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम या विषयावर सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन रत्ना पवार यांनी तर आभार ज्येष्ठ शिक्षिका विजया मोगल यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सखी सावित्री समितीच्या प्रमुख ज्योती भामरे, अंतर्गत तक्रार समिती प्रमुख विजया मोगल तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment