गणेशोत्सव राज्य महोत्सव
यंदा राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ दर्जा दिल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळख अधिक गडद होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. या विषयीच्या विविध निर्णयांची माहिती देणारा हा लेख.महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो, जिथे तो एक सार्वजनिक उत्सव बनला आहे. १९ व्या शतकात, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला एक सार्वजनिक सण म्हणून सुरू केले, ज्यामुळे तो अधिक लोकप्रिय झाला. विशेषतः मुंबई – पुण्याचा गणेशोत्सव जगप्रसिद्ध आहे. जगात आणि देशात आपल्या गणेशोत्सवाची ओळख सर्वात मोठा महोत्सव म्हणून झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. महाराष्ट्र शासनाने यंदा गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्याने विशेष आनंद आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सवात सहभागी असते. आता ‘गणेशोत्सव’ प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा हा मुख्य उद्देश आहे. यासाठी प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, अशा सूचना सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी सर्व राज्य आणि केंद्र शासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने आणि आता राज्य शासनामार्फतही साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा उत्सव असावा. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी १० कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली गेली असून समाज माध्यमांवरून विशेष मोहीम राबवली जात आहे. पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतर्फे उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पुरस्कृत करणे. राज्यातील सुमारे ४८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सुमारे १.५० कोटी रुपये इतक्या रकमेची पारितोषिके वितरित करण्यात येणार आहेत.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वर्ल्ड युनेस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावेत. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंध, चित्रकला, ब्लॉग स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, अशा सूचनाही शासनाने दिल्या आहेत.गणेशोत्सवाच्या १० दिवसांच्या काळात आपापल्या विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत “ऑपरेशन सिंदूर”द्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा. तसेच आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत.गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळख अधिक घट्ट होणार आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार आहे. वर्षानुवर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव यावर्षी राज्य महोत्सव म्हणून साजरा करण्यास शासनाची यंत्रणा सज्ज झाली असून गणेशोत्सव मंडळे व घरगुती गणेश आरास स्पर्धा, चौकाचौकात रोषनाई, ड्रोन शो, विविध सांस्कृतिक कार्यक्रम अशा प्रकारे जल्लोषात गणेशोत्सव साजरा होणार आहे. शासन निर्णयानुसार तालुका स्तरापासून राज्य स्तरावर विविध गणेशोत्सव मंडळ जे धार्मिक प्रथा परंपरानुसार सहभागाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक उपक्रमात काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना पारितोषिकाची घोषणा केली आहे. तसेच गिरगाव चौपाटीवर ड्रोन महोत्सव आयोजन करण्यात येणार असून पुणे, नाशिक, नागपूर, मुंबई आणि राज्यातील सर्व भागात स्थानिक स्तरावर शक्य असेल त्या सार्वजनिक ठिकाणी रोषणाई करण्यात येणार असून गणेशोत्सव काळामध्ये भजनी मंडळांना भजनामधील साहित्यासाठी थेट लाखो रुपयांचे अनुदान देण्याची योजना घोषित झाली आहे. परदेशातही गणरायाचे आगमन धुमधडाक्यात व्हावे, म्हणून हा राज्य महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा व्हावा, ही भूमिका घेण्यात आली आहे. या महोत्सवांतर्गत, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा राज्य, जिल्हा, तालुका या तीनही स्तरांवर होणार आहे. या स्पर्धेचे अर्ज पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबईच्या pldeshpandekalaacaderny.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे ऑनलाइन स्वरूपात स्वीकारले जात आहेत. ही स्पर्धा विनामूल्य आहे. नोंदणीकृत व परवानाधारक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. विजेत्या मंडळांना तालुकास्तरावर एक, जिल्हा व राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांनी गौरविले जाणार आहे. यासोबतच, महाराष्ट्रातील घरगुती गणपतीचे दर्शन, सार्वजनिक गणपतीचे दर्शन व विविध प्रसिद्ध गणेश मंदिरातील गणपतींचे लाईव्ह दर्शन अकादमीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ganeshotsav.pldmka.co.in पोर्टलद्वारे घरबसल्या घेता येणार आहे. आपल्या घरगुती अथवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे छायाचित्र या पोर्टलद्वारे विनामूल्य प्रसिद्ध करता येईल. याकरीता अधिकाधिक मंडळांनी व कुटुंबांनी आपल्या गणपतीची छायाचित्रे ganeshotsav.pldmka.co.in या पोर्टल द्वारे प्रसिद्ध करावीत व सर्वांना श्री गणरायाचे दर्शन घेता येईल याची व्यवस्था करावी. हा ‘गणेशोत्सव- राज्य महोत्सवाचा’ शासन निर्णय गणरायाच्या चरणी घोषित करताना आनंद होत असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी सांगितले. याबाबत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा आणि विविध कार्यक्रम यांचे दोन स्वतंत्र सविस्तर शासन निर्णयही जारी करण्यात आले आहेत. पु. ल. देशपांडे कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे या महोत्सवाचे नियोजन व समन्वय करण्यात येत आहे. गणेशोत्सवात यंदा शासनाचा सहभाग मोठ्या प्रमाणात राहणार आहे. गणेशोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून शासकीय आस्थापनाच्या इमारती, वारसास्थळांवर या बोधचिन्हाची रोषणाई करण्यासोबत महत्त्वाच्या चौकाचे सुशोभीकरण करुन रोषणाई करावी. संपूर्ण राज्यभर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्राची कला व संस्कृती आणि परंपरेचे दर्शन या कार्यक्रमांतून घडेल. हे कार्यक्रम फक्त महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी मराठी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणीही करण्यात येत आहेत. तसेच मराठी भाषिक बहुल भारताबाहेरील काही देशामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. काही ठिकाणी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने अध्यात्म नाट्यरंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येत आहे. ज्या चित्रपटांमधून गणपती विषयक परंपरा, कला संस्कृती दर्शवलेली आहे, अशा चित्रपटांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. गणेशोत्सवावर आधारित टपाल तिकीट आणि नाणे काढण्यात येईल. संपूर्ण राज्यभरातून गणपतीविषयक रिल्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘ड्रोन शो’ चे आयोजन करण्यात आले आहे. या राज्य महोत्सवाची माहिती संपूर्ण देशभर व्हावी यासाठी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, रेडिओ आणि समाज माध्यमे यांच्या माध्यमातून देशभरात प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय व आंतरराज्यीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विशेष कार्यक्रम, उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. उत्सवाच्या दरम्यान प्रमुख ठिकाणी विद्युत रोषणाई व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. पारंपरिक भजन व आरती सादर करणाऱ्या भजनी मंडळांना साहित्य वाटप, अनुदान देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. विसर्जन सोहळ्यामध्ये आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी विविध सोयी-सुविधा व वाहन व्यवस्था उपलब्ध करण्यात येणार आहे. राज्यात शिकत असणाऱ्या देशाबाहेरील विद्यार्थ्यांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी योजना,उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपकाच्या वापराबाबत परवानगी जिल्हाधिकाऱ्यांना परवानगी देण्यात आली असून याबाबत प्रशासनाने गणेश मंडळ, लोकप्रतिनिधी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला आहे. प्रसिद्ध गणेश मंडळे, गणेश मंदिरांनी भक्तांकरिता थेट प्रक्षेपणाद्वारे घरातूनच दर्शनाची सोय उपलब्ध करुन द्यावी, केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलाचा बँड शो आणि पोलीस दलांचा बँड शो तसेच डॉग शोचे आयोजन करावे. शाळा, महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनांचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांना सहभागी करुन उपक्रमाचे आयोजन करावे. महावितरणने गणेश मंडळांना वीज उपलब्ध करुन द्यावी. आरती करणाऱ्या भजनी मंडळाना मोफत साहित्य वाटप करण्यात यावे. विसर्जन मार्गावर ड्रोन शोचे आयेाजन, जाहिरात फलकांवर सामाजिक संदेश देण्याची कार्यवाही करावी. विदेशी विद्यार्थी, नागरिक, विदेश दुतावासातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाबाबत देण्यात येणाऱ्या अंदाजानुसार प्रशासनाने तयारी करावी.
गणेशोत्सवानिमित्त सर्वांचा सन्मान झाला पाहिजे, अधिकाधिक व्यक्ती, संस्था आणि विविध समाजघटकांना सामाजिक सलोख्यासाठी एकत्रित आणावे. विविध सांस्कृतिक विषयांचे जतन व संवर्धन करण्याबाबत तालुका आणि जिल्हास्तरावर विविध स्पर्धां आयोजित कराव्यात. मराठी संस्कृती, कलाकार, पंरपरांना प्रोत्साहन देण्याकरीता मराठी नाट्यमहोत्सव आयोजित करण्यात यावा. विविध विषयांबाबत व्याख्यानमाला, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करावे. समाजमाध्यमाद्वारे व्यापक स्वरुपात प्रसार आणि प्रचार करावा. गणेश मंडळांनी ऑपरेशन सिंदूर, स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करुन त्यांच्या कर्तृत्वावर आधारित माहिती फलक लावावेत. मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा. यंदाचा गणेशोत्सव राज्य महोत्सव म्हणून सर्वांच्या स्मरणात राहील असाच साजरा करावा हीच गणेशभक्तांकडून अपेक्षा
अनिल आलुरकर उपसंचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय, अमरावती
Comments
Post a Comment