यशवंतराव चव्हाण व डॉ कलामांसारखे निस्वार्थ आयुष्य जागा - भास्कर पेरे पाटील
नाशिक :- कोणतेही गाव आदर्श बनवायचे असेल तर गावातील प्रत्येक व्यक्तीने गावाच्या सर्वांगीण विकासात सहभाग घेतला पाहिजे. मनुष्याचे आयुष्यमान कमी होत असतांना प्रामुख्याने स्वच्छ पिण्याचे पाणी , वृक्ष लागवड ,वैयक्तिक स्वच्छता,बाहेरचे खाद्यपदार्थ टाळणे,नवीन पिढीला संस्कार, जेष्ठांना जीव लावणे या गोष्टींचा अंगीकार करून कोणतेही काम प्रमाणिकपणे व सामुहिक प्रयत्नाने गाव सुधारण्यासाठी करून आदर्श गाव बनु शकते. यशवंतराव चव्हाण व डॉ कलाम यांनी आपले आयुष्य समाजासाठी दिले,त्यांचा आदर्श घेऊन प्रत्येकाने निस्वार्थ जीवन जगावे असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंती निमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक व मविप्र समाज संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान प्रसंगी रावसाहेब थोरात सभागृहात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण सेंटर जिल्हा केंद्र नाशिक चे अध्यक्ष व मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे होते, व्यासपीठावर मविप्र संस्थेचे उपाध्यक्ष विश्वास मोरे, चिटणीस दिलीप दळवी,उपसभापती देवराम मोगल,संचालक कृष्णाजी भगत,ॲड.संदीप गुळवे,प्रविण जाधव, ॲड. लक्ष्मण लांडगे,रमेश पिंगळे, विजय पगार,अमित बोरसे,ॲड.बाकेराव बस्ते,विजय गडाख, सेवक संचालक डॉ एस के शिंदे,सी डी शिंदे, विक्रांत मते,ॲड.राजेंद्र डोखळे,डॉ.विलास देशमुख,डॉ.भास्कर ढोके,डॉ नितीन जाधव, प्रा.सुरेखा बोऱ्हाडे उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी ‘ मविप्र संस्था व यशवंतराव चव्हाण सेंटर या समाजाचा विचार करणाऱ्या संस्था आहे. जनसामान्यांनी संतांचे विचार आत्मसात करून चांगला समाज व देश घडविण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच समाजाला शिस्त लावण्यासाठी सरकारने नियम करावे. माणसाचे आयुष्यमान ६० वर्ष होत असतांना ७५ वर्षावरील लोकांना बस मोफत देण्यापेक्षा शाळा कॉलेजातील मुलांना सरकारने बससेवा मोफत करावी.समाजाला योग्य पद्धतीने समजावून सांगितल्यास समाज ऐकतो हे त्यांनी उदाहरणासह पटवून सांगितले.
ॲड.नितीन ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगतात ' यशवंतराव चव्हाण हे उत्तम प्रशासक,साहित्यिक होते. कला,क्रीडा क्षेत्रात त्यांचा वावर होता.महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी बहुमोल योगदान दिले. देशाचे संरक्षण व अर्थमंत्री म्हणून महत्वाचे योगदान दिले. त्यांचा आदर्श आजच्या पिढीने घ्यावा यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर च्या वतीने अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरु असल्याचे सांगतांना कर्मवीर ॲड.बाबुराव ठाकरे यांनी आपल्या कार्यकाळात ७५ शाळा व फार्मसी महाविद्यालय सुरु करून संस्थेच्या प्रगतीत बहुमोल योगदान दिल्याचे सांगितले. यावेळी महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते एम पी एस सी उत्तीर्ण विद्यार्थी सत्कार तसेच २५ सेविकांना साडी चोळी वाटप करण्यात आले. यावेळी स्व.यशवंतराव चव्हाण व ॲड.बाबुराव ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविकात ॲड.राजेंद्र डोखळे यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर च्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ विलास देशमुख यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ तुषार पाटील यांनी व आभार प्रदर्शन डॉ सुरेखा बोऱ्हाडे यांनी केले.
महाराष्ट्रात आतापर्यंत ७ हजार आमदार झाले परंतु एकही गांव ते आदर्श करू शकले नाही परंतु याउलट महाराष्ट्रातील आदर्श असणाऱ्या पाटोदा,हिवरेबाजार व राळेगणसिद्धी या गावांमध्ये एकही आमदार नसून ती गावे आदर्श ठरली आहेत. तसेच झाडे हि पावसाचे ATM असून जास्तीत जास्त झाडे लावावीत. कोरोना काळात आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावा लागला. झाडांशिवाय पाऊस पडू शकत नाही असेही भास्कर पेरे पाटील यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment