कला क्षेत्रात करीअर च्या मोठ्या संधी - ॲड.नितीन ठाकरे
मविप्र ललितकला महाविद्यालय आयोजित ललितकला उत्सव वार्षिक कला प्रदर्शन २०२४ चे दिमाखात उद्घाटन
नाशिक :- गुरुवार १४ मार्च रोजी मराठा विद्या प्रसारक समाज संचलित ललितकला महाविद्यालय आयोजित ललित कला उत्सव वार्षिक कला प्रदर्शन २०२४ चे उद्घाटन संस्थेचे सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले, यावेळी संचालक अमित बोरसे, ॲड.लक्ष्मण लांडगे , स्था.व्य.स.सदस्य हिरामण सोनवणे, शिक्षणाधिकारी डॉ भास्कर ढोके, नाशिक कला निकेतन चे प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण,ललितकला प्राचार्य मुंजा नरवाडे, आय टी आय प्राचार्य संजय बोरस्ते उपस्थित होते.
सरचिटणीस ॲड नितीन ठाकरे यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ' कला प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना एक चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले असून विद्यार्थ्यांमधील चित्र व शिल्पकला वाखाणण्याजोगी आहे. कला क्षेत्रात करिअर च्या मोठ्या संधी उपलब्ध असून कला शिक्षकांची दिवसेंदिवस वाणवा भासत आहे. दैनंदिन शिक्षणाला कला व संस्कृतीची जोड दिल्यास शिक्षण आनंदी होते. ललितकला महाविद्यालयाच्या माध्यमातून धावपटू कविता राऊत यांचा पूर्णाकृती पुतळा उभारला असून संस्थेच्या शैक्षणिक वारसा संग्रहालयाच्या उभारणीत देखील महाविद्यालयाने मोलाची कामगिरी केलेली आहे. आयुष्यभर स्मरणात राहील अशी विश्वविक्रमी शिवप्रतिमा साकारण्यात देखील महाविद्यालयाच्या शिक्षक व विद्यार्थ्यांचा पुढाकार होता असे सांगून कला उत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी महाविद्यालय व संस्थेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात प्राचार्य मुंजा नरवाडे यांनी ' विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या जीवनाला योग्य दिशा मिळते असे सांगितले. यावेळी राज्यस्तरीय चित्र - शिल्प प्रदर्शनात पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांना तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कला उत्सव उद्घाटनप्रसंगी प्रा.विजय काळे, प्रा.तुषार कट्यारे, प्रा.महेश राऊत, प्रा.महेश अडबल, प्रा.विक्रम आंबरे, प्रा.अविनाश आडके, गणेश झिंजुरके, संतोष तागड, रोहित बोरसे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापिका प्राजक्ता मोगल यांनी तर आभार मुंजा नरवाडे यांनी मानले. ललितकला प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून मराठा हायस्कूल च्या मागील ललितकला महाविद्यालयाच्या कलादालनात शनिवार दि. १६ मार्चपर्यंत सर्वांना पाहता येईल अशी माहिती उत्सवाचे आयोजक शिक्षणाधिकारी डॉ विलास देशमुख व प्राचार्य मुंजा नरवाडे यांनी दिली आहे.
Comments
Post a Comment