महाराष्ट्र कृषी पणन विभागामार्फत ३ दिवशीय तृणधान्य महोत्सवाचे उद्घाटन
पौष्टिक तृणधान्य काळाची गरज - ॲड. नितीन ठाकरे

नाशिक :- धावपळीच्या जीवनशैली मुळे उदभवणाऱ्या आजारांना दूर ठेवण्यासाठी आहारात तृणधान्याचा वापर वाढायला हवा. या आहारामुळे शरीर सशक्त बनते. पौष्टिक तृणधान्य ही काळाची गरज असून त्याचा सर्वांनी नियमित वापर करावा, असे आवाहन मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे यांनी केले.
राज्य कृषी पणन मंडळ पुणे, विभागीय कार्यालय नाशिक यांच्या सहकार्याने १ ते ३ मार्च दरम्यान मविप्र संस्थेच्या उदाजी महाराज शैक्षणिक वारसा संग्रहालयात मिलेट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. त्याचे उदघाटन शुक्रवारी (ता.१) ॲड.नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी कृषी पणन मंडळाचे एस.वाय.पुरी, विभागीय कृषी उपसंचालक संभाजी ठाकूर, मिसेस इंडिया इंटरनॅशनल शुभदा जगदाळे, आदिवासी विकास विभागाचे प्रताप पाडवी, मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ.अशोक पिंगळे, डॉ.विलास देशमुख, डॉ.भास्कर ढोके, डॉ.नितीन जाधव,मविप्र कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बापूसाहेब भाकरे, पणन मंडळ विभागीय व्यवस्थापक बी. सी. देशमुख, श्याम पाटील उपस्थित होते. येत्या रविवारपर्यंत (दि.३ मार्च ) सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मिलेट महोत्सव सर्वांसाठी खुला असणार आहे. यामध्ये उत्पादक ते ग्राहक थेट विक्री उपलब्ध असून तृणधान्यापासून बनविलेले पदार्थ, राळा, ज्वारी, बाजरी, सावा, कोद्रा, बर्टी, वरई, हिरवी पिवळी भगर, थालीपीठ पराठा व मिक्स पीठ याचे प्रदर्शन व विक्री सुरु आहे. महोत्सव यशस्वीतेसाठी पणन मंत्री अब्दुल सत्तार,कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक विनायक कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे हेमंत अत्तरदे, सचिन पाटील, शामराव पाटील, विलास सोनवणे,आनंद शुक्ल, विशाल पाटोळे, दिगंबर शिंदे,महेश वसईकर,सनी काटे यांनी परिश्रम घेतले. वृषाली गोडसे यांनी सूत्रसंचालन केले.बी.सी.देशमुख यांनी आभार मानले.
मिलेट महोत्सवात सहभागी बचत गट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्टअप कंपन्यांनी ३७ स्टॉल उभारले आहेत. यात अस्सल ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर, राळा, सामा, कोद्रा ही तृणधान्ये व ज्वारीचा रवा, बाजरीच्या लाह्या, रागीची बिस्किटे, ज्वारीचे इडली-मिक्स, रागीचा डोसा मिक्स इत्यादी नाविण्यपूर्ण उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे मविप्र संस्थेच्या कृषी महाविद्यालयाने ‘ज्वारी’पासून तयार केलेली कुल्फी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.
Comments
Post a Comment