सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थांचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुलुंड (पूर्व) येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृह उद्घाटन सोहळा 

मुंबई दि. १४:- सामाजिक कार्यात पुढे राहणाऱ्या संस्थाचा महाराष्ट्राला समृद्ध वारसा लाभला आहे. या संस्थांनी नेहमीच सर्वच जाती-धर्मांचं हित पाहिले आहे. लोकाभिमुख कामांमध्ये या संस्थांनी केलेले काम अतुलनीय आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे कुणबी समाजोन्नती संघाच्यावतीने मुलुंड येथे उभारण्यात आलेले हे देखणे वसतीगृह असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

कुणबी समाजोन्नती संघाच्या वतीने मुलुंड (पूर्व) येथे उभारण्यात आलेल्या कुणबी विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमास उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, खासदार मनोज कोटक, कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्यासह संघाचे मान्यवर पदाधिकारी व नगरिक उपस्थित होते.

उद्या मकर संक्रांतीचा सण साजरा होत आहे. मकर संक्रातीच्या पूर्व संध्येला अशा या समाजाभिमुख कार्यक्रमास उपस्थित राहता आले हा आपल्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, आजचा दिवस व हा क्षणही आपल्या सर्वांसाठी गोड आणि समाधानाचा आहे. समाजोन्नती संघांनी एक मोठी मजल मारली आहे. आपला हा वसतीगृहाचा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यासाठी कष्ट घेणाऱ्या सर्वांचे आपण या प्रसंगी अभिनंदन करतो. समाजाच्या योगदानातून समाजोपयोगी तेही शिक्षणाच्या क्षेत्रात असं भरीव काम होणं हे आपल्या महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. त्यासाठी कुणबी समाजोन्नती संघाचं मनापासून अभिनंदन.

मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, सरकारने समाजातील सर्व घटकासाठी चांगले निर्णय घेत आहे. सरकार हे सर्व सामान्यांचे आहे, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी शासन काम करत आहे. ओबीसी समाजासाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत
शासनाने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सुरू केला आहे. या विभागाच्या माध्यमातून इतर मागास व अन्य समाजातील होतकरू तरुणांना, शिक्षण, स्वयंरोजगार आणि उद्योगांसाठी शासन पाठबळ देत आहे. ओबीसी समाजासाठी राज्यात ७२ वसतिगृह सुरू करण्यात येत आहेत. ओबीसी समाजाला आवश्यक सोयी सुविधा पुरवणार असून ओबीसी समाजासाठी राज्यात दहा लाख घरे बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी सांगितले.

शिक्षण आणि शैक्षणिक सुविधांमध्ये महाराष्ट्र पुढं आहे. त्याचं कारणही आपल्या या अशा संस्थाच आहेत.
शासनही अशा संस्थांना पाठबळ देण्यात नेहमीच पुढाकार घेत असल्याचे मुख्यमंत्री  शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री  शिंदे म्हणाले, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. शामराव पेजे महामंडळाला अधिकाचा निधी व
परेल येथील वास्तूलाही आवश्यक निधी दिला जाईल. या बरोबरच तालुका स्तरावरील कुणबी भवन साठी आवश्यक मदत केली जाईल.

उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, कुणबी समाज हा शेतकरी आहे मुलुंड येथे उभारण्यात आलेल्या या वसतिगृहात मुंबईत शिक्षणासाठी येणाऱ्या त्यांच्या मुलांची सोय होणार आहे. शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळास अधिक निधी मिळावा. कुणबी समाजाच्या तालुकास्तरावरील कुणबी भवनसाठी निधी मिळावा, अशी मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री महोदयांकडे केली.
खासदार सुनील तटकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.


Comments

Popular posts from this blog

मा.नगरसेवक यशवंत निकुळे यांच्या विरोधात अनवधानाने दाखल तक्रार मागे

टिसीला जखमी करुन पसार झालेल्या इसमाला रेल्वे पोलीसांनी बेड्या ठोकल्या

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते दत्त देवस्थान येथील विविध विकास कामांचे उद्घाटन