नाशिकच्या जलपरिषदेत दहा मागण्या सादर - विकास पाटील
उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची स्थापन करा
सोमेश्वर येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र जल परिषदप्रसंगी विकास पाटील, प्रदीप अहिरे, प्राचार्य एन. एम. भामरे, अर्जुन पाटील, दीपक पाटील आदी
नाशिक - भविष्यातील प्रत्येक दुष्काळप्रवण स्थितीला तोंड देण्यासाठी उतर महाराष्ट्र जल परिषद कटिबद्ध असून या अभियान अंतर्गत दुष्काळमुक्त उत्तर महाराष्ट्रासाठी नदीजोड प्रकल्प आराखडा मार्गदर्शिकेच्या रुपात तयार करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करण्याची आवश्यकता असल्याचे मत उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील यांनी नोंदविले.
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाच्या वतीने सोमेश्वर येथे आयोजित उत्तर महाराष्ट्र जल परिषदेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील जलक्षेत्राचं, जलस्त्रोतांचं, जलसाठ्यांचं वास्तव सर्वांच्या समोर ठेवण्याचा अल्पसा प्रयत्न आम्ही करीत आहोत.राज्यात दुष्काळ घोषित करण्यात आला आणि त्यात आपला तालुका आहे, म्हणून स्थानिक तहसीलदारांचे अभिनंदन करण्यात आले, तसेच आमदार, खासदार, मंत्र्यांनी कार्यक्रम घेऊन श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. मात्र या गोष्टीचे कोणालाही शल्य वाटू नये ही खेदाची बाब असल्याचे पाटील यांनी सांगितले.
खान्देश (कान्हदेश) ही पूर्वापार कृषीवलांची भूमी, प्रदेशातील एकूण भूप्रदेशापैकी सुमारे २/३ क्षेत्र हे पिकांखाली आहे. येथे एकूण मनुष्यबळाच्या ६०% लोक हे शेतीवर अवलंबून आहेत.पर्जन्यमानाचे निकष पाहता ५ जिल्हे व ५० तालुक्यांपैकी ४६ तालुके हे अवर्षणप्रवण गटात मोडतात. या क्षेत्रात ७५० मिमी पेक्षा कमी पाऊस पडतो. या परिस्थितीत राज्यातील शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या एकुण गरजेपैकी ११ % क्षेत्राची गरज ही धरणे-कालवे, साठवण तलाव, डोह-बंधारे अशा भूपृष्ठजल सोयींनी भागवली जाते तर उर्वरित जवळजवळ ९० ते ९५% शेती ही मोसमी पावसाच्या लहरीवर अवलंबून आहे. या क्षेत्रासाठी पाण्याची गरज विहीरी- बोअरवेलद्वारे उपसा होणाऱ्या भूजलावर भागविण्याचा प्रयत्न होतो. यात प्रामुख्याने पाझर तलाव व इतर पुनर्भरण योजनांचीही मदत होते. ही दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी यासाठी जल परिषदेत पाणी प्रश्नावर चिंतन व मंथन करण्यात आले.
या अभियानाची माहिती ऑनलाईन, ऑफलाइन पध्दतीने व्याख्याने, कार्यशाळा, परिसंवाद, शिबिरे, चर्चासत्रे व जलयात्रेच्या माध्यमातून देण्यासाठी जलअभियान राबविले जात आहे. या अभियानाबद्दल जनजागृती करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
याप्रसंगी उपाध्यक्ष प्रदिप अहिरे, कार्याध्यक्ष प्राचार्य एन. एम. भामरे, अर्जुन पाटील, दिपक पाटील यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्या दहा मागण्याही सादर करण्यात आल्या. जल परिषदेस किशोर पाटील,प्रा.प्रकाश माळी, मधुकर शिसोदे, संजय बिलाले, प्रा.विजय पाटील, विश्वनाथ पाटील, विनोद शेलकर, सुभाष सरोदे, विनोद शिंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
नदीजोड प्रकल्प आराखडा
सध्या उत्तर महाराष्ट्रातील ४० तालुक्यांच्या ८५% भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.दुष्काळ जाहीर करण्याचे विविध निकष असतात, केंद्रीय पथक स्वतः शेताच्या बांधांवर जाऊन आणि स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेऊन तपासणी करतात आणि दुष्काळस्थिती बाबतीत आपला अहवाल राज्य व केंद्र शासनाला देत असतात. सध्या अनेक ठिकाणी आपले गाव दुष्काळी यादीत समाविष्ट आहे किंवा नाही यावर वादंग होत आहेत. यानिमित्ताने खान्देशात येत्या काळात काय स्थिती असेल, ती ओढविण्याची कारणे कोणती आणि त्यावर उपाय काय याबद्दलची माहिती "दुष्काळमुक्तीसाठी तयार करण्यात आलेल्या नदीजोड प्रकल्प आराखडा" या मार्गदर्शिकेत नमूद केले आहे.
Comments
Post a Comment